- प्रकाश बेळगोजीबेळगाव : पुराच्या पाण्यातून सुमारे अडीच किलोमीटर अंतर पोहत जाऊन राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील मन्नूर येथील निशांत मनोहर कदम याने.येथील ज्योती महाविद्यालयात निशांत बारावीत शिकतो. राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक राज्य संघात निवड झाली होती. ही स्पर्धा सात आॅगस्टला बंगळुरू येथे होती. मात्र याच दरम्यान सुरु झालेल्या पावसामुळे येथील मार्कंडेय नदीला मोठा पूर आला.या पूरामुळे मन्नूरचा बेळगावसह अन्य शहरांशी संपर्क तुटल्याने त्याच्यापुढे स्पर्धेला कसे जायचे हा प्रश्न निर्माण झाला. या स्पर्धेत सहभागी व्हायचेच, असे त्याने ठरवले होते. त्याच्या या जिद्दीला त्याच्या वडिलांनीही साथ देण्याचे ठरवले.शेतकरी असलेल्या मनोहर कदम यांनी निशांतचे सर्व साहित्य प्लास्टिकच्या पिशवीत गुंंडाळले व पुराच्या पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी तब्बल अडीच किलोमीटर अंतर पार करत बेळगाव गाठले. बापलेकांनी हे अंतर ४५ मिनिटांत पार केले. बेळगावहून रेल्वेने निशांतने बंगळुरू गाठले. या स्पर्धेत त्याने सहभाग तर घेतलाच त्याच बरोबर त्याने रौप्यपदकही पटकावले. निशांत अर्जुन पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक मुकुंद किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुष्टियुद्धाचा सराव करत आहे.
अडीच किलोमीटर पुरातून पोहून जात त्याने मिळवले रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 3:59 AM