चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास
By admin | Published: May 27, 2017 12:50 AM2017-05-27T00:50:21+5:302017-05-27T00:50:21+5:30
आतापर्यंत सातवेळा खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत भारत आणि आॅस्टे्रलियाने प्रत्येकी दोनवेळा बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका व वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा जेतेपद मिळवले आहे.
आतापर्यंत सातवेळा खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत भारत आणि आॅस्टे्रलियाने प्रत्येकी दोनवेळा बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका व वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा जेतेपद मिळवले आहे. २००२ साली भारत व श्रीलंकेला पावसाच्या व्यत्ययामुळे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले. क्रिकेटच्या इतिहासामध्ये न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आयसीसी स्पर्धा म्हणून केवळ याच स्पर्धेचे विजेतेपद आहे.
दोन महिन्यांच्या आयपीएल सर्कसनंतर क्रिकेटप्रेमींना वेध लागले ते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे. आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघांमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा यंदा ‘चॅम्पियन्सचा वर्ल्डकप’ म्हणूनही ओळखली जात आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारतीय संघ गतविजेता असल्याने भारतीयांची उत्सुकता ताणली आहे. विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाखाली आपले वन-डे स्पेशालिस्ट खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
मात्र, या घडामोडींआधी या स्पर्धेचा रंजक इतिहास जाणून घेऊ. अनेक देशांचा समावेश असलेली ही स्पर्धा विश्वचषक स्पर्धेनंतरची सर्वांत मानाची आणि मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत सात वेळा झालेली ही स्पर्धा १९९८ सालापासून खेळवली जात आहे. यंदा तिसऱ्यांदा इंग्लंडमध्ये ही स्पर्धा खेळविली जात आहे. यासह या स्पर्धेचे सर्वाधिक तीनवेळा यजमानपद भूषविण्याचा मान इंग्लंडने मिळवला आहे. सुरुवातीला ‘आयसीसी नॉकआउट टुर्नामेंट’ असे नाव असलेली ही स्पर्धा २००२पासून ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ नावाने ओळखली जाऊ लागली. २०१३ साली ही स्पर्धा अखेरची म्हणून खेळवली जाणार होती व या स्पर्धेऐवजी ‘आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप’ खेळविण्याचा निर्णय झाला होता. मात्र, २०१४ साली टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा विचार रद्द करून चॅम्पियन्स ट्रॉफी कायम खेळविण्याचा निर्णय झाला.
२००६ सालापर्यंत ही स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळविली जायची. मात्र, २००८ साली पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव २००९मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आली. श्रीलंकेच्या संघावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सर्वच संघांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे, ही स्पर्धा त्या वेळी रद्द करण्यात आली होती. यासह दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आलेल्या स्पर्धेपासूनच ही स्पर्धा दर चार वर्षांनी खेळविण्याचा निर्णय झाला.
जगातील जवळपास सर्व प्रमुख संघांचा स्पर्धेत समावेश असला तरी ही स्पर्धा विश्वचषक स्पर्धेपेक्षा नक्कीच वेगळी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने जवळपास दोन आठवड्यांमध्ये संपतात, तर विश्वचषक स्पर्धा सुमारे महिनाभर सुरू असते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्वरूपामध्येही कालांतराने बदल झाले. २००२ आणि २००४ साली ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने चार गटांमध्ये खेळली गेली. प्रत्येक गटात ३ संघ होते. प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीत खेळला. २००६मध्ये स्पर्धेत आयसीसी क्रमवारीतील अव्वल ८ संघांना प्रवेश देण्यात आला. या वेळी दोन गटांत प्रत्येकी ४ संघांची विभागणी करण्यात आली. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य सामने खेळले. यामुळे एकही सामना गमावणे प्रत्येक संघासाठी महागडे ठरू लागले.
- रोहित नाईक