डिकॉक, पंतकडून आक्रमक खेळीची आशा
By admin | Published: May 12, 2016 02:48 AM2016-05-12T02:48:03+5:302016-05-12T02:48:03+5:30
डेअरडेव्हिल्सची मोहीम निर्णायक वळणावर आहे. या संघाला हैदराबादेत हैदराबादविरुद्ध दोन हात करायचे आहेत. खेळाडूंना मैदानावर आणखी तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल
डेअरडेव्हिल्सची मोहीम निर्णायक वळणावर आहे. या संघाला हैदराबादेत हैदराबादविरुद्ध दोन हात करायचे आहेत. खेळाडूंना मैदानावर आणखी तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. दिल्ली संघाने स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. डेअरडेव्हिल्स हे करू शकतो, ही चांगली बाब म्हणावी लागेल.
प्ले आॅफच्या रेसमध्ये हैदराबाद, गुजरात, कोलकाता आघाडीवर आहेत. दिल्ली आणि मुंबईसाठी प्ले आॅफची दारे काहीशी बंद दिसत आहेत. चालत्या बसमध्ये चढण्यासाठी लोखंडी रॉडला पकडण्याची धडपड आठवते का, अनेकदा लोखंडी रॉड हातातदेखील येत नसे. हीच स्थिती मुंबईवर ओढवली. दिल्लीची स्थिती तशी खराब नाही. या संघाचे किमान सहा फलंदाज अर्धशतकवीर आहेत. या संघातील अनेक खेळाडू प्रतिस्पर्धी संघाला हरवण्याची ताकद बाळगतात. अशास्थितीतही दिल्लीला एखाद्या बाहुबली खेळाडूची गरज आहेच. शानदार शतक झळकविल्यापासून डिकॉकची बॅट शांत आहे. त्याच्याकडून संघाला कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची गरज असेल. चांगली कामगिरी करणारे संघ सलामीवीरांवर बऱ्याचअंशी विसंबून आहेत. पण, दिल्लीला सलामीवीरांकडून कधीच चांगली सुरुवात लाभली नाही. क्विंटन डिकॉक आणि ऋषभ पंत सलामीला आक्रमक खेळून दिल्लीची सुरुवात धडाकेबाज करू शकतात. सध्या मॉरिस आणि ब्रेथवेट यांना विश्रांती देण्यात येत आहे. अधूनमधून त्यांना संघात स्थान दिले जाते. वेगवान गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास दिल्लीकडे अशा खेळाडूंची उणीव नाही. जहीर, शमी आणि मॉरिस यांच्यानंतर कोल्टर नाईलची सेवा शिल्लक आहे. फिरकीत अमित मिश्रा आणि इम्रान ताहिरपाठोपाठ ड्युमिनी आणि नदीम आहेतच. (टीसीएम)