नवी दिल्ली : गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची महिला वेटलिफ्टर संजिता चानूने सुवर्णपदक पटकावले होते. पण गुरुवारी संजिताने उत्तेजक द्रव्य घेतल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. पण संजिताने मात्र या गोष्टीचा इन्कार केला आहे. मी कोणत्याही प्रकारचे उत्तेजक सेवन केले नाही आणि याविरोधात मी दाद मागणार आहे, अशी भूमिका संजिताने घेतली आहे.
संजिताने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत संजिताने सहभाग घेतला होता. त्यावेळी तिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये संजिता दोषी आढळली असल्याचे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग महासंघाने गुरुवारी जाहीर केले होते.
याबाबत संजिता म्हणाली की, " मी कधीही उत्तेजकांचे सेवन केलेले नाही. या चाचणीमध्ये मी दोषी आढळले असल्याचे म्हटले जात आहे. पण मला या गोष्टीवर विश्वास नाही. कारण मी निर्दोष आहे. या चाचणीविरोधात मी दाद मागणार आहे आणि मला विश्वास आहे की मी यामधून दोषमुक्त ठरेन. "