दोन भारतीयांनी पाडली छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 02:39 AM2018-06-01T02:39:30+5:302018-06-01T02:39:30+5:30
ग्रेटर नोएडा येथील भारतीय एनबीए अकदामीत सुरू असलेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ (बीडब्ल्यूबी) या विशेष शिबिरामध्ये
रोहित नाईक
नवी दिल्ली : ग्रेटर नोएडा येथील भारतीय एनबीए अकदामीत सुरू असलेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ (बीडब्ल्यूबी) या विशेष शिबिरामध्ये ‘एनबीए’मध्ये चमकलेले खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्याकडून युवा खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षक मिळत आहे. परंतु, या शिबिरातून आगामी युरोप शिबिरासाठी केवळ २ खेळाडूंची निवड झाली असून ते दोन्ही भारतीय आहेत, हे विशेष. प्रिन्सपाल सिंग आणि अमान संधू या दोन खेळाडूंनी या शिबिरात छाप पाडली असून, दोघेही पंजाबचे आहे.
‘बीडब्ल्यूबी’ शिबिरात १७ वर्षांखालील खेळाडूंचा सहभाग असून त्यामध्ये सर्व युवा खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. १६ देशांतील सहभागी झालेल्या ६६ मुलामुलींची विविध संघांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये मुलांचे ४, तर मुलींचे ३ संघ तयार करण्यात आले असून त्या सर्व संघांमध्ये सामने खेळविण्यात येत आहेत. सामना झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे विश्लेषण होत असल्याने युवकांना आपला खेळ सुधारण्यास वाव मिळतो. या वेळी प्रिन्सपाल आणि अमान या दोघांनीही ‘लोकमत’शी संवाद साधला.
अमानने आपल्या आगामी युरोप शिबिराविषयी सांगितले, ‘‘तेथे मी सर्वप्रथम विदेशी खेळाडूंचा स्तर आणि त्यांची क्षमता जाणून घेईन. शिवाय, या खेळाडूंकडून मला अनेक मूव्ह शिकता येतील. त्यामुळे मी खूप उत्साही आहे. त्याचबरोबर मी तांत्रिकदृष्ट्या कुठे कमी पडतोय,
हेही मला कळेल. एकूण माझा
खेळ अधिक सुधारण्यासाठी
संधी मिळेल. त्यासाठी मला नक्कीच मेहनत घ्यावी लागेल व त्यासाठी मी तयार आहे.’’
अमानचा पूर्ण परिवार बास्केटबॉल खेळाडूंचा आहे. त्याचे वडील गुरशरणजितसिंग संधू पोलीस कर्मचारी असून त्यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी भारताचे कर्णधारपदही सांभाळले आहे. अमानची आई राजिंदर कौर राष्ट्रीय बास्केटबॉलपटू असून, त्याची बहीण आकर्षण संधू हिने गेल्याच वर्षी भारतीय संघात प्रवेश केला आहे.
त्याचप्रमाणे, ‘सर्व काही ठरविल्याप्रमाणे झाले, तर पुढे नक्कीच माझी एनबीए खेळण्याची इच्छा आहे. जेव्हा पहिल्यांदा शिबिरात सहभागी झालेलो, तेव्हा इतर खेळाडू व माझ्यात खूप फरक जाणवला; पण आता
तसे काहीच जाणवत नाही.
आता माझा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे. याआधीही मी अमेरिकेत झालेल्या ग्लोबल कॅम्पमध्ये सहभागी झालो होतो. तेथे अव्वल खेळाडूंनी आमच्याशी संवाद साधला. ते शिबिर माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले होते.’’
वडील नेहमी कर्तव्यावर असल्याने त्यांच्याकडून फारसे मार्गदर्शन मिळत नव्हते; पण आई व बहिणीने नेहमी मदत केली. या तिघांमुळेच मी बास्केटबॉलडे वळालो.’’ शिबिरातील इतर देशांच्या खेळाडूंविषयी अमानने सांगितले, ‘‘दुसऱ्या देशाचे खेळाडू शारीरिकदृष्ट्या कणखर असून तुलनेने उंचही आहेत. त्यांचा वेगही शानदार आहे. त्यांच्यासह खेळताना आशिया बास्केटबॉलचा दर्जा कळाला आणि पुढे जागतिक स्तरावर कोणत्या दर्जाचे बास्केटबॉल असेल, याचीही जाणीव झाली आहे. त्यानुसार आता स्वत:ला सज्ज करायचे आहे.
- अमान संधू