महिलांमध्ये वाढतेय शरीरसौष्ठवाची क्रेझ; मुंबई श्रीच्या मंचावर अवतरणार पीळदार सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:12 PM2020-02-26T23:12:05+5:302020-02-26T23:15:16+5:30
29 फेब्रूवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लॅक्सच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबमध्ये रंगणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महिलांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग पाहायला मिळणार आहे.
मुंबई - महिला म्हटली की तिला क्षणोक्षणी तडजोड करावीच लागते. कधी शिक्षणासाठी तर कधी कुटुंबासाठी... लग्न झालं की नवऱ्यासाठी आणि मुल झालं की त्याच्यासाठी... स्वत:च्या करिअरकडे, आवडीनिवडींकडे त्यांना मनापासून कधी लक्षच देता येत नाही. पण आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर केवळ स्वत:च्या पॅशनसाठी "स्पार्टन मुंबई श्री"च्या मंचावर पीळदार सौंदर्य अवतरणार आहे. येत्या 29 फेब्रूवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लॅक्सच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबमध्ये रंगणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महिलांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग पाहायला मिळणार आहे. सध्या महिलांमध्येही फिटनेस आणि शरीरसौष्ठवाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून मिस मुंबई जेतेपदासाठी फिटनेस फिजीक आणि शरीरसौष्ठव या दोन गटांत चुरशीची लढत होणार असल्यामुळे या स्पर्धेबाबतही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतीय शरीरसौष्ठवात सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेत महिलांच्या गटानेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. फिटनेस फिजीक आणि शरीरसौष्ठव या दोन्ही गटात पाचपेक्षा अधिक खेळाडूंची नोंद झाल्यामुळे स्पर्धा रंगतदार होणार, यात वाद नाही. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने या स्पर्धेसाठीही जोरदार तयारी केली आहे. या स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा आणि फिटनेसबाबत जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे चीज "स्पार्टन मुंबई श्री" मध्ये होणार असल्याची भावना संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी बोलून दाखवली. अनेक महिला आपल्या पीळदार सौष्ठवाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून स्पर्धेच्या दिवशी थेट स्पर्धेला येणाऱया खेळाडूंचा आकडा महिला फिटनेस क्षेत्राला स्फूर्ती देणारा असेल, असा विश्वास सरचिटणीस राजेश सावंत यांनी व्यक्त केला.
दोन वर्षांपूर्वी महिलांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे रद्द करावी लागणारी मिस मुंबई यावेळी दणक्यात होतेय. गतविजेती मंजिरी भावसार, दिपाली ओगले,रेणूका मुदलियार, निशरीन पारिख, डोलान आचार्य असं पीळदार सौंदर्य फिटनेस फिजीक प्रकारात धमाका करतील तर शरीरसौष्ठव स्पर्धेत अमला ब्रम्हचारी, श्रद्धा डोके, माया राठोड अशा खेळाडू "कुछ कर दिखाना है" म्हणत उतरणार आहेत. स्पर्धेत उतरणाऱ्या बहुतांश खेळाडू या केवळ आपल्या पॅशनसाठी खेळणार आहेत. ऐन उमेदीच्या काळात विविध कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना आपल्या आवडींसाठी वेळ देता आला नव्हता, पण आता सारं काही बाजूला सारून त्या बिकीनीत उतरून आपल्या फिटनेसचे अनोखे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
पॅशनसाठी सारं काही...
भारतीय महिला म्हणजे तडजोडींचं मूर्तीमंत उदाहरणच. पावलोपावली, क्षणोक्षणी तडजोड करावीच लागते. आम्हाला स्वत:च्या फिटनेससाठी जिमची पायरी चढणेही कठिण होतं. आधी शिक्षणासाठी स्वत:च्या आवडींची आहूती दिली. मग लग्नासाठी करिअरला मागे सारलं. लग्नानंतर आई होण्याचं आव्हान, मग मुलांची जबाबदारी. आयुष्यातील महत्त्वाची दहा वर्षे तडजोड केल्यानंतर आता स्वत:च्या आवडींवर मी माझं लक्ष केंद्रित केलंय. निव्वळ पॅशनसाठी शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरत असली तरी मी माझी कोणतीही जबाबदारी झटकलेली नाही. पण पहिल्याएवढं प्रेशर आता माझ्यावर नाहीय. एखाद्या स्त्रीने मनात आणलं तर ती काहीही साध्य करू शकते. हेच मला दाखवून द्यायचंय, असा विश्वास व्यक्त केलाय शरीरसौष्ठवपटू डॉ. माया राठोड यांनी. स्वत: गायनाकालॉजिस्ट असलेल्या माया यांना शालेय जीवनापासूनच खेळाची आवड होती. पण त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता आलं नाही. घरात सर्वच डॉक्टर असल्यामुळे त्यासुद्धा डॉक्टरच झाल्या. आज एक यशस्वी डॉक्टर असूनसुद्धा त्या निव्वळ पॅशनसाठी मिस मुंबई स्पर्धेत खेळणार आहेत. त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत. माया यांच्याप्रमाणे गतविजेत्या मंजिरी भावसारसुद्धा होमियोपॅथीच्या डॉक्टर आहेत आणि एका बारा वर्षीय मुलाच्या आईसुद्धा. त्यांनाही आपल्या पीळदार सौंदर्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नाव उंचवायचेय. एका प्रख्यात विमान कंपनीत हवाई सुंदरी असलेल्या रेणूका मुदलियारसुद्धा स्वत:च्या वेडेपणासाठी फिटनेस क्षेत्रात उतरल्या आहेत. कुटुंबातल्या अनेक आव्हांनाना सामोरे जात आजवरचा प्रवास करणाऱ्या रेणूका यांच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास फार सोप्पा नव्हता.
मिस मुंबईत खेळणाऱ्या अनेक खेळाडू अशा आहेत की त्यांना दररोज नवनव्या आव्हांनाशी दोन हात करून पुढे यावं लागतंय. काहींनी फिटनेस क्षेत्रात करिअर घडविण्याचे ध्येय बाळगले आहे, पण कुटुंबियांचा विरोध त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करताहेत. बिकीनीत उतरणाऱ्या मुलीला, सूनेला, बहिणीला पाहणं त्यांना रूचत नाहीय. लोकं काय म्हणतील? या विचारांनी अनेकींचं पॅशन प्रेशरखाली येतंय. तरीही बिकीनीत उतरण्याचं धाडस या पीळदार सौंदर्यवती करून दाखवणार आहेत. घरच्यांचं विरोध पत्करून मंचावर उतरणाऱ्या या महिलांना मायबाप क्रीडारसिकांकडून पाठीवर शाबासिकीची एक थाप हवीय. बिकीनी आमचं गणवेष आहे. ड्रेसकोड आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूला चाहत्यांकडून मनापासून दाद मिळते, तोच आमच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार असतो. त्याच पुरस्कारासाठी आम्ही साऱ्या आसुसलेल्या आहोत, अशी विनम्र भावना मिस मुंबईत सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंची आहे.