ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6- भारताच्या प्रांजल येडलापल्लीने मुलींच्या अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून फिलिपिन्सच्या किम इजलुपसचा चुरशीच्या झालेल्या उपांत्य लढतीत २-१ सेटने पराभव करून आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी झालेल्या दुहेरीच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात तोरू होरी व युनोसुकी तनाका व मुलींच्या गटात रिफंती काफिआनी व तैपेईच्या यांग ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद जिंकले. महाराष्ट्र राज्य व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत भारताच्या व पाचव्या मानांकित सध्याचा जागतिक क्र. ९४ असलेल्या प्रांजल येडलापल्लीने आपली विजयी मालिका कायम ठेवत फिलिपिन्सच्या किम इजलुपसचा २-६, ६-४, ६-२ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना सुमारे दोन तास चालला. चीन्या झियु वांगने सहाव्या मानांकित व चीनच्याच यांग लीचा ६-१, ६-२ असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत तोरू होरी व युनोसुकी तनाका या जोडीने चेंगझी लिऊ व लिंगक्सी झाओचा ६-३, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात इंडोनेशियाच्या रिफंती काफिआनी व तैपेईच्या यांग ली या जोडीने मायुका एकावा व प्रांजल येडलापल्लीचा ६-४, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी राष्ट्रीय डेव्हिस कप प्रशिक्षक नंदन बाळ आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संयोजन सचिव आश्विन गिरमे आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर उपस्थित होते. स्पर्धेत दुहेरी गटांतील विजेत्या जोडीला १२० आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला ८० गुण मावळा व महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेली बाहुली करंडक पारितोषिक म्हणून देण्यात आले. निकाल : (उपांत्य फेरी) मुली : प्रांजल येडलापल्ली (भारत, ५) वि. वि. किम इजलुपस (फिलिपिन्स) २-६, ६-४, ६-२; झियु वांग (चीन) वि. वि. यांग ली (चीन, ६) ६-१, ६-२;मुले : ताजिमा नाओकी (जपान, ८) वि. वि. टँग ए. (हाँगकाँग, ७) ७-६ (३), ६-३; लिम अलबेर्टो (फिलिपिन्स, २) वि. वि. युता शिमीझु (जपान, ३) ६-७ (३), ६-३, ६-३; * दुहेरी गट : मुली : अंतिम फेरी : रिफंती काफिआनी (इंडोनेशिया) / यांग ली (तैपेई) वि. वि. मायुका एकावा (जपान) / प्रांजल येडलापल्ली (भारत) ६-४, ६-३; मुले : अंतिम फेरी : तोरू होरी / युनोसुकी तनाका वि. वि. चेंगझी लिऊ / लिंगक्सी झाओ ६-३, ६-४. (क्रीडा प्रतिनिधी)