दोहा : फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत सलामीला ओमानकडून १-२ ने धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारताने मंगळवारी बलाढ्य कतारचे आव्हान गोलशून्य बरोबरीत परतवले. जागतिक क्रमवारीत ६२ व्या क्रमांकावर असलेला आशियाई विजेता कतार तुलनेत कमजोर असलेल्या भारताला मात देईल, अशी शंका व्यक्त केली जात होता. सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानवर ६-० असा विजय मिळवल्यामुळे भारताविरुद्धही कतारचेच पारडे जड मानले जात होते. तथापि १०३ व्या क्रमांकावरील भारताने त्यांचे आव्हान दमदार खेळी करून परतवून लावले.
आक्रमक खेळ करणाऱ्या यजमान संघाला भारताने एकदाही गोल करू दिला नाही. यामुळे भारताच्या विश्वचषकाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने उपस्थित प्रेक्षकांचे हात वर करून आणि टाळ्या वाजवून अभिवादन केले. त्यावेळी भारतीय संघासाठी स्टेडियममध्ये टाळ्यांचा पाऊस पडला. स्टार सुनील छेत्रीच्या अनुपस्थित भारताचे नेतृत्त्व करणाºया गोलरक्षक गुरप्रीत सिंगचे भक्कम संरक्षण या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. गुरप्रीतने जबरदस्त संरक्षण करताना कतारचे आक्रमण अनेकदा रोखून त्यांना गोल करण्यापासून दूर ठेवले.
या आधी चारपैकी तीन अधिकृत लढती कतारने जिंकल्या होत्या, तर एक लढत बरोबरीत सुटली होती. या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत कतारने भारताचा ६-० असा धुव्वा उडवला होता. २०२२ मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाºया कतारने गेल्या काही वर्षांत आपल्या खेळात कमालीची सुधारणा घडवून आणली. यावर्षी संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या आशियाई चषकाचे विजेतेपद त्यांनी पटकावले.
निमंत्रित म्हणून खेळणाºया कतारने कोपा अमेरिका स्पर्धेत दक्षिण आशियाई संघांनाही कडवी झुंज दिली होती. त्यामुळे भारताचा त्यांच्यापुढे निभाव लागेल की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात साशंकता होती. पण भारतानेही गेल्या काही दिवसात आपली कामगिरी उंचावली असून आशियाई स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात आणि बहारिनसारख्या संघांना चांगली लढत दिली. बाद फेरी मात्र थोडक्यात हुकली होती. एक गुण मिळाल्याचा आनंद - प्रशिक्षक स्टिमकआशियाई चॅम्पियन कतारला रोखून एका गुणाची कमाई केल्याचा आनंद असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी व्यक्त केले. मात्र पुढील सामन्यात अतिआत्मविश्वासात न राहण्याचा खेळाडूंना सल्लाही दिला. स्टिमक म्हणाले, ‘आम्ही फार पुढचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून वेळ घालवू इच्छित नाही. काही दिवसांआधी ओमानकडून पराभूत झालो. यानंतर कतारविरुद्ध वरचढ खेळ करत एक गुण मिळू शकलो.’ भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे बोट दाखविणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘आमचा संघ तंदुरुस्त आहे, हे खेळाद्वारे दाखवून दिले.’ भारताला आता १५ आॅक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे सामना खेळायचा आहे.‘फुटबॉलमध्ये काहीही घडू शकते!’‘मला माझ्या संघाच्या कामगिरीवर फारच गर्व वाटतो. सांघिक प्रयत्नात आम्हाला यश आले. अन्य सामन्यांमध्ये या खेळाचा लाभ होईल. आम्ही आतापर्यंत दोनच सामने खेळले आणि दोन्हीवेळा बलाढ्य संघांना सामोरे गेलो. यामुळे आत्मविश्वासात भर पडली असून, फुटबॉलमध्ये काहीही शक्य असल्याचा अनुभव आला. सर्व सहकाºयांनी शंभर टक्के योगदान दिल्यामुळे समाधानाने ड्रेसिंग रुममध्ये परत आलो,’ असे भारताचा हंगामी कर्णधार गुरप्रीत सिंग याने सांगितले.