ध्यास सर्वोत्तमाचा! वेध टोकियो ऑलिम्पिकचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:32 AM2020-01-01T03:32:57+5:302020-01-01T06:49:42+5:30

भारताने २०२८ साली क्रीडा महासत्ता बनण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. ‘स्पोर्ट्स वॉचिंग नेशन’ ते ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी ऑलिम्पिकमधील यश अधिक मोलाचे ठरू शकते.

india eyeing tokyo 2020 Olympic | ध्यास सर्वोत्तमाचा! वेध टोकियो ऑलिम्पिकचे

ध्यास सर्वोत्तमाचा! वेध टोकियो ऑलिम्पिकचे

Next

भारताने २०२८ साली क्रीडा महासत्ता बनण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. ‘स्पोर्ट्स वॉचिंग नेशन’ ते ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी ऑलिम्पिकमधील यश अधिक मोलाचे ठरू शकते. ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढीस लागते.

मका हाच ध्यास डोळ्यापुढे ठेवून नववर्षात ‘टोकियो ऑलिम्पिक २०२०’कडे पाहिले जात आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या खेळाच्या या महाकुंभात १३५ कोटी लोकसंख्येचा आपला देश किती पदकांची मजल गाठेल, हे सांगणे कठीणच. मात्र त्यादृष्टीने सरकारी पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि खेळाडूंनी चालविलेली प्रयत्नांची पराकाष्ठा याचा उल्लेख व्हायलाच हवा.

भारताचा ऑलिम्पिकचा इतिहास फारसा चांगला नाही. आतापर्यंत केवळ २८ पदके देशाच्या वाट्याला आली, त्यात ९ सुवर्ण आहेत. या नऊमध्ये वैयक्तिक खात्यात एकच सुवर्ण, ते म्हणजे नेमबाजीत अभिनव बिंद्राचे पदक. तरीही टोकियोत सर्वोत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करणे गैर नाही. यासाठी ज्यांच्याकडून सर्वाधिक आशा आहेत त्यात २१ व्या वर्षी रिओ ऑलिम्पिकचे रौप्य जिंकणारी पी.व्ही. सिंधू हिचे नाव सर्वांत आघाडीवर असेल. विश्व विजेतेपदाचा मुकुट स्वत:कडे खेचून सिंधूने अपेक्षा वाढवली. ऑलिम्पिक सुवर्णाची आता तिच्याकडून आशा करता येईल.

एमसी मेरीकोम हे नाव विश्व बॉक्सिंगवर अधिराज्य गाजविणारे आहे. ती टोकियोत खेळेल की नाही हे निश्चित नसले तरी मेरीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, युवा अमित पांघल यानेही विश्व बॉक्सिंगचे ऐतिहासिक रौप्य जिंकून ऑलिम्पिक पदकाची आशा पल्लवित केली आहे. शूटिंगमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असेल. एनआरएआयने स्वत: ऑलिम्पिकमध्ये किमान पाच पदके जिंकण्याचा दावा केला आहे. सौरभ चौधरी, मनू भाकर, अपूर्वी चंदेला हे सर्व दावेदार असतील. सौरभने यंदा विश्व शूटिंग स्पर्धेत ६ सुवर्ण जिंकले. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तो पदकाचा प्रबळ दावेदार असेल. अंजुम मुदगिल आणि राही सरनोबत या क्रमश: १० मीटर एअर रायफल आणि २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात आशास्थान आहेत.

भारोत्तोलनात २०१ ते २०४ किलो वजन उचलू शकल्यास मीराबाई चानूकडूनही पदकाची अपेक्षा बाळगता येईल. अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता गाठू शकल्यास भालाफेकपटू नीरज चोप्रा, हिमा दास, दूती चंद, मोहम्मद अनस आदी खेळाडू आपापली कामगिरी उंचावू शकतील, मात्र पदकाची अपेक्षा बाळगणे घाईचे ठरेल असे दिसते. आर्चरीत दीपिका आणि अतानू दास हे भारतीय आव्हान देणार आहेत.
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने पात्रता गाठली आहे. दोन्ही संघ पदकाच्या निर्धाराने उतरणार असले तरी मार्गातील अडथळे सोपे नाहीत. टेनिसमध्ये सानिया मिर्झा-अंकिता रैना ही जोडी दुहेरीत किती मजल गाठते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

२००८ च्या बीजिंग ते २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकपर्यंत कुस्तीने भारताला एक तरी पदक जिंकून दिले आहे. यंदा कुस्तीकडून किमान दोन पदकांची आशा बाळगता येईल. सर्वांत मोठी भिस्त बजरंग पुनियावर असेल. अनेक स्पर्धांमध्ये पदक विजेता असलेल्या बजरंगची नजर यंदा सुवर्णावर राहील. याशिवाय महिला मल्ल विनेश फोगाट हिच्याकडूनही पदकाची आशा आहे.

Web Title: india eyeing tokyo 2020 Olympic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.