गोल्ड कोस्ट (आॅस्ट्रेलिया) : अव्वल मानांकित आणि दहावेळेचा चॅम्पियन चीनविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत ०-३ ने पराभवाचा धक्का बसताच भारतीय संघ सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडला.नववे मानांकन लाभलेल्या भारतासाठी चीनचे आव्हान मोडित काढणे अवघड होते. अश्विनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या मिश्र जोडीने लू काई-हुआंग याकियोंग या जागितक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोडीने कडवे आव्हान दिल्यानंतरही भारतीय जोडीला पराभूत व्हावे लागले. चीनच्या अनुभवी जोडीने पहिल्या सामन्यात अश्विनी- साईराज यांच्यावर १६-२१,२१-१३,२१-१६ ने एक तास तीन मिनिटांत विजय नोंदविला.के. श्रीकांत आणि आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीकांतने प्रारंभी प्रतिकार केला. ४८ मिनिटे चाललेल्या चढाओढीत श्रीकांत १६-२१, १७-२१ ने पराभूत झाला.सात्विक साईराज आणि चिराग सेन या युवा जोडीचा फू हायफेंग- झांग नान या जोडीने पुरुष दुहेरीत ९-२१,११-२१ ने पराभव करताच चीनची एकतर्फी आघाडी ३-० अशी झाली. यानंतरचा महिला एकेरीचा सामना केवळ औपचारिक होता. त्यानंतर महिला दुहेरीचा सामनादेखील खेळायचा होता पण सामन्याचा निकाल आधीच लागल्यामुळे हे दोन्ही सामने खेळविण्याची गरज भासली नाही. भारताने याआधी २०११ मध्ये स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. त्यावेळीदेखील चीनकडून १-३ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेत चीनने केवळ एक सामना गमविला होता. उपांत्य फेरीत चीनची गाठ जपान आणि मलेशिया यांच्यातील विजेत्यांविरुद्ध पडेल. (वृत्तसंस्था)
सुदीरमन स्पर्धेतून भारत बाहेर
By admin | Published: May 27, 2017 12:39 AM