नवी दिल्ली : विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला नमविल्यानंतर विश्वनाथन आनंद याने शानदार लय राखून रियाध येथील विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांनंतर पुन्हा जगज्जेता होण्याचा मान मिळविला. याआधी २००३मध्ये आनंदने अंतिम लढतीत ब्लादीमिर क्रामनिकला नमवून विश्वविजेतेपद जिंकले होते.स्पर्धेचा दुसरा दिवस भारताचा ४८ वर्षीय विश्वनाथन आनंदच्या नावावर राहिला. एकूण १५ फे-यांच्या या स्पर्धेत माजी विश्वविजेत्या आनंदची जेतेपदाची भूक अजूनही संपलेली नाही आणि तो दहाव्या फेरीअखेर साडेसात गुणांसह संयुक्तपणे दुस-या स्थानावर होता. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला नवव्या फेरीत नमवून आनंदने २०१३च्या पराभवाचा वचपा काढला. अखेरच्या पाच फेºयांमधील चढाओढ बरीच गाजली. रशियाचा ग्रॅण्ड मास्टर व्लादिमिर फेडोसीव्ह आणि इयान नेपोग्नियाश्ची यांचे १५ पैकी प्रत्येकी साडेदहा गुण होते. आनंदने टायब्रेकरमध्ये फेडोसीव्हवर २-० असा विजय नोंदवित विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. १४ व्या फेरीत पांढºया मोहºयांंसोबत खेळून रशियाचा अलेक्झांडर ग्रुसचूक याच्यावर मात करण्यापूर्वी आनंदने दोन लढती अनिर्णीत सोडविल्या.दुसरीकडे कार्लसनने रशियाचा ब्लादिस्लॉव अर्तेमिव्ह याला रोखताच आनंद संयुक्तपणे आघाडीवर आला होता. अखेरच्या लढतीत आनंदने चीनचा बू शियांग्जीविरुद्ध लढत अनिर्णीत राखली तर कार्लसनला ग्रिसचूककडून अनपेक्षित पराभवाचा धक्का बसताच आनंद १५ व्या फेरीअखेर सहा विजय आणि नऊ ड्रॉ अशा वाटचालीसह जग्गजेताठरला. यंदाच्या सत्रात खराब फॉर्मशी झुंज देत राहिलेल्या आनंदने वर्षाचा शेवट मात्र जेतेपदाने केला. (वृत्तसंस्था)>‘जेतेपद अनपेक्षित, अविश्वसनीय’चेन्नई : ‘स्पर्धेला सुरुवात केली तेव्हा इतका सकारात्मक विचार नव्हता. तथापि अपराजित राहून जगज्जेतेपद पटकविल्यावर माझा स्वत:चा विश्वास बसत नाही.’ हे अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया १४ वर्षांनंतर पुन्हा ६४ घरांचा ‘राजा’ बनलेल्या विश्वनाथन आनंदने व्यक्त केली.४८ वर्षांचा आनंद म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांत सलग खराब कामगिरी होत असल्याने टीकेचा भडिमार सहन करावा लागत आहे. मागील दोन जलद बुद्धिबळ स्पर्धा माझ्या दृष्टीने खराब ठरल्या. त्यामुळे या स्पर्धेआठी माझा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नव्हताच. येथे अनपेक्षितरीत्या माझ्याकडून चांगला खेळ झाला.’ माजी विश्वविजेता आनंद हा स्पर्धेत अपराजित राहिला. तो पुढे म्हणाला, ‘यंदाचे सत्र माझ्यासाठी फारच कठीण गेले. लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेत चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा होती,पण अखेरच्या स्थानावर राहणे माझ्यासाठीधक्कादायक होते. या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून मी चांगला खेळत राहिलो. जेतेपदामुळे माझे जुने दिवस आठवत आहेत.’ नवव्या फेरीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्यावर मिळविलेला विजय निर्णायक ठरल्याचे विश्वनाथन आनंद याने सांगितले. ‘माझ्याकडे आता जलद बुद्धिबळ विश्वजेतेपद असल्याचा अभिमान वाटतो. हा आनंद शब्दापलीकडचा आहे,’ अशी प्रतिक्रिया आनंदने या वेळी दिली. आनंदची पत्नी अरुणा हिनेदेखील आनंदचे कौतुक केले. ‘मला या जेतेपदाची खूप प्रतीक्षा होती,’ अशा शब्दांत तिने आपला आनंद व्यक्त केला.>अभिनंदनाचा वर्षावविश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविल्याबद्दल राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी विश्वनाथन आनंदचे अभिनंदन केले आहे. टिष्ट्वट करीत राष्ट्रपती म्हणाले, ‘आनंदचे जगज्जेतेपदाबद्दल अभिनंदन. आनंदची सातत्यपूर्ण कामगिरी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. देशाला तुझ्यावर गर्व वाटतो.’आनंदचे अभिनंदन. तुम्ही नेहमी आपली मानसिक मजबुती दाखवली आहे. तुमचा दृढ निश्चय देशासाठी प्रेरणादायी आहे. जलद बुद्धिबळमधील तुमच्या यशाचा भारताला गर्व आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानजागतिक जलद बुद्धिबळचे जेतेपद जिंकल्याचे आनंदला शुभेच्छा. दृढता, मानसिक मजबुती आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती तुम्हाला केवळ बुद्धिबळच नाही, तर सर्वच खेळाडूंसाठी प्रेरणादायी बनवत आहे.- राज्यवर्धन सिंग राठोड, केंद्रीय क्रीडामंत्री
जलद बुद्धिबळात भारताला पुन्हा ‘आनंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:27 AM