राष्ट्रकुल यजमानपदासाठी भारत प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:47 AM2019-12-31T01:47:55+5:302019-12-31T01:47:57+5:30
बर्मिंगहॅम स्पर्धेसाठी पथक पाठविणार
नवी दिल्ली : ‘२०२६ किंवा २०३० राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत दावेदारी सादर करणार आहे,’ असे भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) सोमवारी म्हटले. त्याचसोबत आयओएने नेमबाजीला वगळल्यामुळे २०२२ बर्मिंगहॅम स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बदलण्यास सहमती दर्शवली असल्याचेही यावेळी आयओएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आॅलिम्पिक खेळाची देशातील अव्वल संस्था आयओए आता राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी आवश्यक मंजुरी मिळविण्यासाठी सरकारसोबत संपर्क साधणार आहे. भारताने २०१० मध्ये या स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते. वार्षिक आमसभेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले की, ‘आम्ही २०२६ किंवा २०३० च्या राष्ट्रकुल यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याचा निर्णय घेतला. तसएच आम्ही २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपले पथक पाठविण्याचा निर्णयही घेतला.’ आयओएने भारतीय रायफल महासंघाच्या (एनआरएआय) बर्मिंगहॅम स्पर्धेपूर्वी वेगळ्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदाच्या प्रस्तावाला स्वीकृतीही दिली. त्यामुळे २०२२ च्या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याच्या निर्णयाची काही अंशी भरपाई होईल, अशी आशा आहे. आयओए लवकरच एनआरएआयचा प्रस्ताव स्वीकृतीसाठी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडे (सीजीएफ) पाठविणार आहे. त्यानंतर सीजीएफ कार्यकारी समिती यावर निर्णय घेईल.
गेल्या आठवड्यात सीजीएफने याबाबत एनआरएआयला पुढील महिन्याच्या सुरुवातीपर्यत औपचारिक प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. एनआरएआयने या स्पर्धेच्या यजमानपदाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ‘वैकल्पिक खेळ’ मध्ये समावेश असलेल्या नेमबाजीला बर्मिंगहॅम स्पर्धेतून वगळल्यानंतर आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी भारताने या स्पर्धेतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.