Commonwealth Games 2022, Sakshi Malik wins Gold Medal: भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने धमाकेदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने ६२ किलो वजनी गटात कॅनडाच्या गोडीनेज गोन्झालेझ हिला पराभूत करत गोल्ड मेडल मिळवलं. साक्षी पहिल्या फेरीत ०-४ अशी पिछाडीवर होती पण दुसऱ्या फेरीत साक्षीने प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलाच दम दाखवला. तिने गोडीनेज गोन्झालेझला चितपट करून तिची पाठ टेकवली आणि ४-४ अशा बरोबरीसह सुवर्ण पदकावर नाव कोरलं. साक्षीने प्रतिस्पर्ध्याला चितपट केल्याने (by Fall) तिला विजेती जाहीर करण्यात आलं.
त्याआधी, भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कॅनडाच्या लाचलन मॅकनील याचा दणक्यात पराभव केला. बजरंग पुनियाने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याला मॅकनीलने काही वेळा टक्कर दिली. पण अखेर बजरंग पुनियाने ९-२ असा अतिशय सहज आणि एकतर्फी प्रकाराने हा सामना जिंकला आणि यंदाच्या स्पर्धेत कुस्तीतील भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
तर सुरूवातीला भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिक (Anshu Malik) हिने ५७ किलो फ्री स्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिच्याकडून अंशूला ७-३ ने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशू मलिकने उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोत्झचा आणि उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिम्नेडीसचा १०-० असा पराभव केला होता. आजच्या सामन्यातही अंशूने सुरूवातीचे २ राऊंड्स मिनिटभराच्या आतच जिंकले. पण नंतर सामना फिरला. दोन वेळा राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिने आपला आक्रमक खेळ दाखवला आणि अखेर ७-३ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.