काठमांडू : 13 वी दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे 1 ते 10 डिसेंबर या कलावधीत होत आहे. सदर स्पर्धेत खो-खो सामने 1 ते 4 डिसेंबर या कलावधीत काठमांडू येथे सुरू आहेत. 2015-16 साली झालेल्या दक्षिण आशियाईस्पर्धेत भारताने सुवर्ण पदक मिळवले होते.
आज काठमांडू येथे झालेल्या पुरुषांच्या सामन्यात बाळासाहेब पोकार्डेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेचा 21-08 असा एक डाव राखून 13 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारताच्या अक्षय गणपुलेने तीन मिनिट दहा सेकंद संरक्षण केले, सुदर्शनने दोन मिनिट संरक्षण केले व तपन पॉलने दोन मिनिट वीस सेकंद संरक्षण करताना एक गडी बाद केला, तर कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने दोन मिनिटे संरक्षण केले, सागर पोद्दारने दोन मिनिटे संरक्षण करताना तीन गडी बाद केले व आक्रमणात सत्यजित सिंगने 5 गडी बाद केले तर अभिनंदन पाटील व श्रेयस राऊळने प्रत्येकी तीन 3-3 गडी बाद केले व विजयात मोलाचा वाटा उचलला तर पराभूत श्रीलंकेच्या चंद्रसिरी, व थिगारामल यांनीच थोडाफार लढत दिली. या सामान्यांनंतर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब पोकार्डेने “ही आमच्यासाठी चांगली सुरुवात आहे. उद्या बांगलादेशविरुद्ध चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. आम्ही पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहोत,” असे संगितले.
महिलांच्या लढतीत नसरीनच्या (कर्णधार) नेतृत्वाखाली खेळताना भारताने श्रीलंकेचा 32-04 असा एक डाव 28 गुणांनी दणदणीत पराभव केला. भारताच्या मुकेशने पाच मिनिटे संरक्षण केले. अपेक्षा सुतारने तीन मिनिट वीस सेकंद संरक्षण करत निवृत्ती स्वीकारली व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले, सस्मिता शर्माने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले, पोर्णिमा सकपाळने चार मिनिटे वीस सेकंद संरक्षण करत चार खेळाडू बाद करताना विजयाची पायाभरणी केली तर पराभूत श्रीलंकेच्या खेळाडूंना विशेष चमक दाखवता आली नाही.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना भारताच्या अधिकार्यांनी दक्षिण आशियाई खेळांमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असल्याचे संगितले.
पुरुषांच्या दुसर्या सामन्यात नेपाळने बांगलादेशावर 21-19 असा चुरशीच्या सामन्यात दोन गुणांनी विजय खेचून आणला. महिलांच्या दुसर्या सामन्यात यजमान नेपाळने बांगलादेशावर 11-09 असा एक डाव दोन गुणांनी विजय संपादन केला.