भारताचा ‘विराट’ विजय

By admin | Published: October 17, 2016 04:42 AM2016-10-17T04:42:11+5:302016-10-17T04:44:55+5:30

विराट कोहली याने नाबाद ८५ धावा ठोकून भारताला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डेत रविवारी सहा गड्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला.

India's 'Virat' Vijay | भारताचा ‘विराट’ विजय

भारताचा ‘विराट’ विजय

Next


धर्मशाला : पदार्पणात हार्दिक पंड्याने (३१ धावांत ३ बळी) गोलंदाजीत चुणूक दाखविल्यानंतर ‘रन मशीन’ विराट कोहली याने नाबाद ८५ धावा ठोकून भारताला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डेत रविवारी सहा गड्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला.
टीम इंडियाने पाहुण्या संघाला ४३.५ षटकांत १९० धावांत रोखल्यानंतर ३३.१ षटकांत ४ बाद १९४ धावा करीत ९०० वा सामना अविस्मरणीय ठरविला. विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडला कसोटी मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप देणाऱ्या भारताने आज पुन्हा धुतले.
भारतासाठी लक्ष्य कठीण नव्हते. रोहित-रहाणे यांनी सलामीला ९.२ षटकांत ४९ धावांची झकास सुरुवात केली. रोहित पायचित झाल्यानंतर रहाणे ६२ धावसंख्येवर बाद झाला. यानंतर विराटने एक टोक सांभाळून १०१ चेंडू आधीच विजय मिळवून दिला. विराटने मनीष पांडेसोबत तिसऱ्या गड्यासाठी ४०, तसेच कर्णधार धोनीसोबत चौथ्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली. धोनी दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. विराटने कॉल दिला होता, पण क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावल्याचे लक्षात येताच विराट माघारी फिरला. धोनी बाद होताच विराटने स्वत:बद्दल नाराजीदेखील व्यक्त केली. तोवर १६२ धावा झाल्यामुळे धोका नव्हताच. विराटने केदार जाधवच्या सोबतीने ईश सोढीला षटकार खेचून सामना संपविला. त्याआधी धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. न्यूझीलंडला १९० धावा करताना अनेक दिव्य पार करावे लागले. धर्मशालाचे मैदान भारतीय संघापेक्षा पाहुण्यांसाठी अनुकूल असल्याचे मानले जात होते. पण घडले वेगळेच. महान खेळाडू कपिलदेव यांच्याकडून वन डे कॅप स्वीकारल्यानंतर पदार्पणी सामना खेळणाऱ्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गोलंदाजांनी न्यूझीलंडची दमछाक केली. टॉम लॅथम आणि टीम साऊदी यांनी संयमी खेळी करीत संघाला १९० अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. दुसरीकडे वेगवान उमेश यादव याने पंड्याला साथ देत ३१ धावांत तीन गडी बाद केले. लेगस्पिनर अमित मिश्रा याने ४९ धावांत तीन, केदार जाधव याने फिरकी मारा करीत सहा धावांत दोन गडी बाद केले.
सलामीचा लॅथम ७९ धावा काढून अखेरपर्यंत नाबाद राहिला. दहाव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या साऊदीने ५५ धावांचा तडाखा दिला. साऊदीने लॅथमसोबत अखेरच्या गड्यासाठी ५८ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केल्यानंतर न्यूझीलंड संघ ४३.५ षटकांत बाद झाला. त्याआधी संघाचे सात फलंदाज १९ षटकांत अवघ्या ६५ धावांत परतले होते.
पंड्याने पहिल्याच षटकात अखेरच्या चेंडूवर मार्टिन गुप्टिलला (१२) अडकविले. रोहितने दुसऱ्या स्लिपमध्ये हा झेल टिपला. कर्णधार केन विल्यम्सनने उमेश यादवच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडून थर्डमॅनला अमित मिश्राकडे झेल दिला. रॉस टेलर भोपळा न फोडताच उमेशचा बळी ठरला. कोरी अँडरसन (४) याने पंड्याच्या चेंडूवर मिडॉफवर उमेशकडे झेल दिला. ल्यूक राँची यालादेखील उमेशने झेल घेत बाद केले. लॅथमने मात्र एक टोक सांभाळून संयम दाखविला. या डावखुऱ्या फलंदाजाला भारतीय गोलंदाज बाद करू शकले नाहीत. धोनीने जाधवला संधी देताच त्याने जिमी निशाम (१०) आणि सँटेनर (००) यांना बाद केले. न्यूझीलंड संघ १०० च्या आता गारद होईल, असे संकेत मिळाले होते, पण लॅथम आणि डग ब्रेसवेल (१५) यांनी आठव्या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी केली. मिश्राच्या चेंडूवर ब्रेसवेल रहाणेकडे झेल देत बाद झाला. यानंतर आलेल्या साऊदीचा ३५ व्या षटकात उमेशने सोपा झेल सोडला. याचा लाभ घेत साऊदीने प्रत्येक चेंडूवर फटका मारून ४५ चेंडूंत करिअरमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. मिश्राच्या चेंडूवर अखेर मनीष पांडेकडे
त्याने झेल दिला. ईश सोढीदेखील मिश्राचा बळी ठरला.(वृत्तसंस्था)
>धोनी बनला दुसरा
सर्वांत यशस्वी कर्णधार
९०० व्या वन डेत रविवारी शानदार विजयासह भारताीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी जगातील दुसरा सर्वांत यशस्वी कर्णधार बनला. न्यूझीलंडविरुद्ध आज सहा गड्यांनी विजय नोंदवित धोनीने आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅलन बॉर्डरला मागे टाकले. २००७ पासून आतापर्यंत धोनीने १९५ सामन्यांत नेतृत्व करीत १०८ सामने जिंकून दिले. बॉर्डरने १७८ पैकी १०७ सामने जिंकून दिले होते. वन डेमध्ये सर्वाधिक सामने जिंकून देणाऱ्या कर्णधारांच्यायादीत रिकी पाँटिंग अव्वल स्थानावर आहे. त्याने २३० पैकी १६५ सामने जिंकून दिले.
विराटने इंदूरच्या तिसऱ्या कसोटीत २११ धावांचा झंझावात केला होता. हा धडाका येथेही कायम राहिला. त्याने ८१ चेंडूंत नऊ चौकार,एका षटकारासह नाबाद ८५ धावांची खेळी केली.
षटकार खेचून सामना संपविला. त्याचे हे २६ वे वन डे अर्धशतक होते. अजिंक्य रहाणे ३३, कर्णधार महेंद्रसिंह धोनी २१, मनीष पांडे १७ आणि रोहित शर्मा १४ यांनीही विजयात योगदान दिले. केदार जाधव दहा धावा काढून नाबाद राहिला.

धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. रोहित गो. पंड्या १२, टॉम लॅथम नाबाद ७९, केन विल्यम्सन झे. मिश्रा गो. उमेश यादव ३, रॉस टेलर झे. धोनी गो. उमेश यादव ००, कोरी अँडरसन झे. उमेश गो. पंड्या ४, ल्यूक राँची झे. उमेश गो. पंड्या १०, जेम्स निशाम झे. आणि गो. जाधव १०, मिशेल सँटेनर झे. धोनी गो. जाधव ००, डग ब्रेसवेल झे. रहाणे गो. मिश्रा १५, टीम साऊदी झे. पांडे गो. मिश्रा ५५, ईश सोढी पायचित गो. मिश्रा १, अवांतर : ११, एकूण : ४३.५ षटकांत सर्व बाद १९० धावा. गडी बाद क्रम : १/१४, २/२९, ३/३३, ४/४३, ५/४८, ६/६५, ७/६५, ८/१०६, ९/१७७, १०/१९०. गोलंदाजी : उमेश यादव ८-०-३१-२, पंड्या ७-०-३१-३, बुमराह ८-१-२९-०, जाधव ३-०-६-२, मिश्रा ८.५-०-४९-३.
भारत : रोहित शर्मा पायचित गो. ब्रेसवेल १४, अजिंक्य रहाणे झे. राँची गो. निशाम ३३, विराट कोहली नाबाद ८५, मनीष पांडे झे. विल्यम्सन गो. सोढी १७, महेंद्रसिंह धोनी धावबाद २१, केदार जाधव नाबाद १०, अवांतर : १४, एकूण : ३३.१ षटकांत ४ बाद १९४ धावा. गडी बाद क्रम : १/४९, २/६२, ३/१०२, ४/१६२. गोलंदाजी : साऊदी ९-०-५७-०, ब्रेसवेल ८-२-४४-१, निशाम ६-०-४०-१, सोढी ४.१-०-३४-१, सँटेनर ८-०-१८-०.

Web Title: India's 'Virat' Vijay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.