भारत-पाक लढत ईडनवर

By admin | Published: March 10, 2016 03:30 AM2016-03-10T03:30:19+5:302016-03-10T03:30:19+5:30

टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान ही ‘हायव्होल्टेज’ लढत आता धरमशालाऐवजी कोलकाता येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी सर्व तर्कविर्तकांना पूर्णविराम देत सामना हलविण्याची घोषणा केली

Indo-Pak match at Eden | भारत-पाक लढत ईडनवर

भारत-पाक लढत ईडनवर

Next

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान ही ‘हायव्होल्टेज’ लढत आता धरमशालाऐवजी कोलकाता येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी सर्व तर्कविर्तकांना पूर्णविराम देत सामना हलविण्याची घोषणा केली. हा सामना दि. १९ मार्च रोजी ईडन गार्डनवर खेळविला जाईल.
आयसीसी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की,
सामना ठरलेल्या दिवशीच कोलकाता येथे होईल.
सामन्याच्या आयोजनावरून राजकीय वातावरण तापल्यामुळे वाद उद्भवला होता. माजी सैनिकांनी सामन्याच्या आयोजनास तीव्र विरोध दर्शविताच हिमाचल सरकारनेदेखील सामन्याला सुरक्षा पुरविण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर पाक सरकारने भारतात संघ पाठविणे लांबणीवर टाकले. शिवाय, सामन्याचे स्थळ बदलविण्याचा आयसीसीकडे आग्रह धरला होता. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार पाक संघ बुधवारी भारतात दाखल होणार होता.
पाकच्या सुरक्षा पथकाने धरमशाला येथील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सामना हलविण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. सुरक्षेच्या कारणांमुळे हा सामना कोलकाता येथे हलविण्यात येत असल्याचे सांगून रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘‘हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या वक्तव्यानंतर परिस्थिती चिघळली. सामन्यादरम्यान निदर्शने होण्याचे आणि व्यत्यय येण्याचे संकेत मिळाल्याने आमच्या चिंतेत भर पडली होती. सामना हलविण्याच्या निर्णयाने चाहत्यांची घोर निराशा होईल, याची आम्हाला जाणीव आहे; पण सुरक्षेचा मुद्दा सर्वाेपरी असल्याने अन्य पर्याय नव्हता.’’
पीसीबीनेदेखील मंगळवारी आयसीसीला पत्र लिहून सामन्याचे पर्यायी स्थळ कोलकाता अथवा मोहाली असावे, असे सुचविले होते. आम्ही हा सामना कोलकाता येथे घेणार असल्याची सूचना पीसीबीला दिली आहे. पीसीबी ही माहिती पाक सरकारला कळविणार आहे. भारतात पाहुण्या संघांना सुरक्षा देणे ही सर्वच राज्य शासनांची जबाबदारी आहे. सर्वच राज्य सरकारांनी तसे आश्वासन दिले असल्याचे रिचर्डसन यांनी स्पष्ट केले.
या निर्णयानंतर बीसीसीआय किंवा एचपीसीएला दंडात्मक शिक्षा दिली जाईल का, असा सवाल करताच रिचर्डसन यांनी ‘नो’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘भारत मोठे आणि किचकट राष्ट्र आहे. प्रत्येक आयसीसी स्पर्धेदरम्यान संकटे येतात. कोलकाता येथे सामना आयोजित करण्याचा निर्णय सर्वोत्कृष्ट आहे. चिंता आधी व्यक्त केली असती, तर आयोजनाला पुरेसा वेळ मिळू शकला असता. आठ ठिकाणी ५९ सामने आयोजित करायचे आहेत. त्यात महिला विश्वचषकाचाही समावेश आहे. कुठल्याही राज्य संघटनेविरुद्ध शिस्तभंगाची करवाई करणे अतिघाईचे ठरेल. सामना झालाच नसता, तर कारवाईचा विचार होऊ शकला असता.’’ (वृत्तसंस्था)
> धरमशाला वादासाठी वीरभद्रसिंह जबाबदार : ठाकूर
नवी दिल्ली : भारत-पाकदरम्यान १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित विश्वचषक टी-२० सामन्याचा वाद चिघळविण्यास आणि शंकास्पद वातावरण निर्माण करण्यास हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हेच दोषी असल्याचा आरोप बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे.पाक बोर्डाने सुरक्षेचे कारण पुढे करीत संघ भारतात पाठविणे लांबणीवर टाकल्यानंतर ठाकूर म्हणाले, ‘या स्थितीस हिमाचल सरकार कारणीभूत आहे. पीसीबीने आता सामना अन्य कुठल्या तरी ठिकाणी हलविण्याची मागणी पुढे केली आहे.’ हिमाचलमधून भाजप खा. असलेले ठाकूर म्हणाले, ‘न्यायालयाच्या निर्देशानंतरही राज्यातील परिस्थिती चांगली नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हेतूवर मला शंका येते. सामन्याच्या नऊ दिवस आधी तुम्ही सामना होऊ शकत नाही, असे बोलत आहात. कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असे बेजबाबदार वक्तव्य करणार नाही.’सामन्याचे स्थळ बदलण्याविषयी विचारताच खा. ठाकूर म्हणाले, ‘पाक आणि आयसीसी स्थितीचे आकलन करतील. मी हेच सांगेन की, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी जगाला चुकीचे संकेत दिले. विश्वचषकाच्या नऊ दिवसांआधी असे वक्तव्य टाळता आले असते. यामुळे राज्याची आणि देशाची प्रतिमा खालावते.’

Web Title: Indo-Pak match at Eden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.