मुंबई : परळच्या जालिंदर आपकेने गतविजेत्या सुशील मुरकरचे कडवे आव्हान मोडित काढत "परळ श्री"चा मान पटकावला. गेल्यावर्षापासून सुरू झालेली "परळ श्री " स्पर्धा टॉप टेन असली तरी 56खेळाडूंनी आपली उपस्थिती नोंदविली. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक परळ श्रीला उतरल्यामुळे मनीष आडविलकरने तात्काळ टॉप टेन ऐवजी टॉप 20 खेळाडूंना रोख पुरस्कार जाहीर केले. आधी 56 खेळाडूंमधून 30 खेळाडू निवडण्यात आले. मग त्यातून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली . त्यानंतर 20 मधून टॉप टेन जाहीर करण्यापूर्वी उर्वरित 10 खेळाडूंना मनीषने सन्मानित केलं.
टॉप टेनमधल्या पहिल्या सहा खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस दिसली. गेल्यावर्षी मुंबई श्री झालेला सुजन पिळणकर पाचवा आला. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की स्पर्धा किती तगडी होती ती. या शर्यतीत सुशांत पवार चौथा तर दीपक तांबीटकर तिसरा आला. तेव्हा परळ श्री विजेत्याच्या नावाची उत्कंठा अक्षरश: शिगेला पोहोचली होती. गतविजेता आणि महाराष्ट्र श्री च्या 85 किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱया सुशील मुरकरकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण गेल्या महिन्याभरापासून प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेल्या जालिंदर आपकेने मुरकरवर मात केली. पुन्हा एकदा चव्हाणांच्या शिष्याने त्याला पराभवाचा धक्का दिला. महिन्याभरापूर्वी चव्हाणांच्याच अनिल बिलावाने मुरकरकडून मुंबई श्रीचे संभाव्य जेतेपद हिसकावून घेतले होते. तीन भारत श्री एकाच मंचावरशरीरसौष्ठवपटूंसाठी आयडॉल असलेले सुहास खामकर आणि श्याम रहाटे अनेक वर्षानंतर एकाच मंचावर दिसले. शरीरसौष्ठव संघटनांमध्ये असलेल्या वादामुळे गेले काही वर्षे सुहास खामकर वेगळ्या संघटनेकडून खेळतोय तर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या श्याम रहाटेने आता स्पर्धात्मक शरीरसौष्ठवातून जवळजवळ निवृत्ती घेतलीय. आठ-दहा वर्षापूर्वी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या हा दोघा भारत श्री विजेत्यांना परळ श्रीच्या निमित्ताने मनीष आडविलकरने एका मंचावर आणण्याचे धाडस दाखवले. तसेच आशिया श्री सुनीत जाधवने या दोघांमध्ये एण्ट्री केल्यामुळे शरीरसौष्ठवाचे स्टार परळ श्रीच्या मंचावर एकाच क्षणी अवतरले. विशेष म्हणजे तिघेही जबरदस्त तयारी होते.त्यांच्या सोबतीला प्रवीण सकपाळ आणि प्रशांत जाधव हे दिग्गज शरीरसौष्ठवपटूही होते.
परळ श्रीचे शरीरसौष्ठव स्पर्धेचे टॉप टेन विजेतेः1. जालिंदर आपके ( हर्क्युलस फिटनेस), 2. सुशील मुरकर (आरकेएम), 3. दीपक तांबीटकर (रिजस फिटनेस), 4. सुशांत पवार ( बॉडी गॅरेज), 5. सुजन पिळणकर (परब फिटनेस), 6. सुशांत रांजणकर ( आर. एम. भट), 7. राजेश तारवे ( शाहूनगर व्यायामशाळा), 8. अर्जुन कुंचिकुरवे ( गुरूदत्त व्यायामशाळा), 9. अमोल गायकवाड (रिसेट फिटनेस), 10. संदीप कवडे (एचएमवी फिटनेस).
परळ श्री फिटनेस फिजीकचे अव्वल सहा खेळाडूः1. रोहन कदम (आर. के. फिटनेस), 2. लवलेश कोळी (गुरूदत्त जिम), 3. निलेश गिरी(आर. के. फिटनेस), 4. मोहम्मद अन्सारी ( आय फ्लेक्स), 5. अनिकेत चव्हाण (रिजस फिटनेस), 6. सरवर अन्सारी (आर.एम.भट),