कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टोक्योत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. अखेरीस मंगळवारी ही स्पर्धा 2021मध्ये घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी फोनवरून ही चर्चा केली आणि निर्णय घेतला. पुढील वर्षी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा घेण्याचे ध्येय असल्याचे अॅबे यांनी सांगितले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा पुढे ढकलावी लागली आहे. या निर्णयाने जपानला प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना सराव करता येत नाही. आतापर्यंत या स्पर्धेसाठी 57 टक्के खेळाडू पात्र ठरले आहेत. ''ही स्पर्धा रद्द करणे अवघड आहे, परंतु ती आता पुढे ढकलण्यात येत आहे. खेळाडूंचे आरोग्य हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,'' असे अॅबे यांनी सांगितले. त्यादृष्टीनं अॅबे आणि बॅच यांच्यात मंगळवारी चर्चा झाली आणि त्यांनी ही स्पर्धा पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये खेळवण्यावर एकमत दर्शवले. जगभरात आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 382,366 इतका झाला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या ही 102,505 इतकी आहे, पण 16,568 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.