जयश्री, सोनियाला सुवर्ण : विश्व पोलिस फायर स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:30 AM2017-08-10T01:30:02+5:302017-08-10T01:30:02+5:30
अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.
कोल्हापूर : अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.
लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने ५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने ८०० मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. ७१ किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात मुंबईच्या रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले.
सन २०१५ मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला ११:३१:२९ ही विक्रमी वेळही मोडत ११:०३:२१ अशी वेळ नोंदवत ५००० मीटर व १०००० मीटर धावण्यात सुवर्ण, तर ५००० मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती. अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.
जयश्री, सोनिया व रवींद्र यांच्या कामगिरीचा आनंद आहे. या तिघांचीही कामगिरी चांगली होती. खरं म्हणजे तिची मुख्य स्पर्धा १५०० मीटरची आहे आणि त्यातही ती नक्कीच सुवर्ण पटकावेल. अमेरिकेतील वातावरणाची दखल घेत जयश्रीचा सराव कोल्हापूरला घेतला. त्याचा खूप फरक पडला. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याचा आत्मविश्वास तिच्याकडे आहे. जयश्रीने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिला मिळाले. आम्हाला तिच्या यशाचा खूप आनंद आहे. या तिघांच्या यशामध्ये पोलिस दलातील क्रीडाधिकारी बाजीराव कलंतरे यांचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे.
- भिमा मोरे (प्रशिक्षक)