जेएमडीवायसी पिकलबॉल: मुंबईकर गौरव राणे, कश्यप बरनवाल यांनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 05:17 AM2021-02-09T05:17:56+5:302021-02-09T05:18:07+5:30
मिश्र दुहेरीत औरंगाबादकरांचे वर्चस्व
मुंबई : कोणतीही घाई न करता संयम आणि आक्रमकतेचा योग्य ताळमेळ साधत गौरव राणे आणि कश्यप बरनवाल या मुंबईकरांनी जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत करिष्मा-क्रिष्णा मंत्री या औरंगाबादच्या खेळाडूंनी बाजी मारली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांना गौरविण्यात आले.
जल मंगल दीप यूथ क्लब (जेमडीवायसी) व रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि अखिल भारतीय पिकबॉल संघटना (एआयपीए) व अमॅच्युअर पिकलबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने ही बांगुर नगर (गोरेगाव) येथे ही स्पर्धा पार पडली. विलेपार्लेच्या प्रबोधनकार क्रीडा ठाकरे संकुलाच्या (पीटीकेएस) गौरव-कश्यप यांनी मिहिर खंडेलवाल व प्रणव धोईफोडे यांना सरळ दोन सेटमध्ये ११-९, ११-८ असे नमवले.
मिश्र दुहेरीत करिष्मा-क्रिष्णा मंत्री या औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. निखिल सिंग राजपूत-शिव कंवर या राजस्थानच्या संभाव्य आणि कसलेल्या जोडीविरुद्ध कोणत्याही दडपणाव्यतिरिक्त खेळत ११-७, ११-६ असा धक्कादायक विजय मिळवला. त्याचप्रमाणे, ४० वर्षांवरील गटात मिहिर खंडेलवाल आणि नोझर अमाल्सादिवाला या मुंबईकरांनी आक्रमक खेळ करताना संदीप तावडे आणि अशोक नथानी या मीरा रोडच्या खेळाडूंचा ११-७, ११-६ असा सहज पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.
राजस्थानचीही छाप
१६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात राजस्थानच्या तन सिंग शेखावत - अभिमन्यू शेखावत यांनी जेतेपद पटकावताना यश गायकवाड-तेजस गायकवाड या औरंगाबादच्या खेळाडूंना ९-११, ११-८, ११-७ असे नमवले. १६ वर्षांखालील मुलींमध्ये सम्राज्ञी परदेशी-कोमल राजदेव यांनी बाजी मारत सौम्या लेले-आर्या कोकाटे यांचा १५-४ असा एकतर्फी पराभव केला.