ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग:सहा भारतीयांचा अंतिम फेरीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:16 AM2021-08-27T10:16:35+5:302021-08-27T10:16:44+5:30
भारताच्या सहा बॉक्सर्सनी दुबई येथे सुरू असलेल्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
नवी दिल्ली : भारताच्या सहा बॉक्सर्सनी दुबई येथे सुरू असलेल्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापैकी दोन बॉक्सर्सना वॉकओव्हर मिळाला. कझाखिस्तानच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्यांचे खेळाडू विलगीकरणात गेले. अंतिम फेरी गाठलेल्या भारतीयांमध्ये २ मुले आणि ४ मुलींचा समावेश आहे.
मुलींमध्ये सिमरन वर्मा (५२ किलो) आणि स्नेहा (६६ किलो) यांचे प्रतिस्पर्धी खेळाडू कझाखिस्तानचे असल्याने त्यांना वॉकओव्हर मिळाला. संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कझाकस्तानच्या खावा बोल्कोयेवा आणि अनार तुरिनबेक या खेळाडूंना विलगीकरणात जावे लागले आहे. भारताचे प्रशिक्षक भास्कर भट्ट यांनी सांगितले की, ‘कजाकिस्तानची एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दुसऱ्या खेळाडूलाही विलगीकरणात जावे लागले. दोन्ही खेळाडू एकाच रूममध्ये राहत होत्या.’ सिमरन आणि स्नेहा यांच्यासह प्रीती (५७ किलो) आणि प्रीती दहिया (६० किलो) यांनीही अंतिम फेरी गाठली. प्रीतीने नेपाळच्या नारिका रायला तिसऱ्या फेरीत नॉकआऊट केले, तर प्रीती दहियाने उझबेकिस्तानच्या रुख्सोना उकतामोवाला ३-२ असे नमवले.
मुलांमध्ये वंशजने (६४ किलो) इराणच्या फरिदी अबुलफजलचा ५-० असा सहज पाडाव केला. विशालने (८० किलो) कझाखिस्तानच्या दौरेन मामिरला ५-० असे लोळवले. त्याचवेळी, दक्षला (५७ किलो) उझबेकिस्तानच्या सोलिजोनोज समंदर याच्याविरुद्ध १-४ असा पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिमन्यू (९२ किलो) आणि अमन सिंग बिष्ट (९२ किलोहून अधिक) यांनाही आपापल्या गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.