मुंबई, दि.2 (क्री.प्र.)- फिटनेसच्या आवडीपोटी जिमच्या पायऱ्या चढणाऱ्या तरूणांना शरीरसौष्ठवाची लागलेली चटक भागवता यावी, तसेच उदयोन्मुख आणि ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली 'ज्यूनियर मुंबई श्री' येत्या शनिवारी 4 जानेवारीला मालाड पूर्वेला असलेल्या सुखटणकर वाडीत रंगणार आहे. ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंना संधीचे पहिले पाऊल असलेल्या या स्पर्धेत सुमारे 70-80 खेळाडू आपल्या नव्या कोऱ्या शरीरयष्टीला लोकांसमोर फुगवणार असून या स्पर्धेतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे भवितव्य पाहायला मिळेल. या स्पर्धेत आजच्या तरूणाईचा आवडता प्रकार असलेल्या फिटनेस स्पोर्टस फिजीक प्रकाराचा समावेश करण्यात आला असून 'नवोदित मुंबई मेन्स फिटनेस स्पोर्टस फिजीक' चा विजेता याच गटातून निवडला जाणार आहे. त्यामुळे फिट असलेली तरूणाई वेगळ्या पोझेस मारताना दिसेलच पण या स्पर्धेबरोबर दिव्यांग आणि मास्टर्स शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे.
शरीरसौष्ठव खेळाची बालवाडी असलेल्या स्पर्धेसाठी मुंबईकर ज्यूनियर खेळाडू गेले तीन-चार महिने जोरदार व्यायाम करीत आहेत. या स्पर्धेत आपल्या फार मोठे खेळाडू पाहण्याची संधी नसली तरी सहभागी स्पर्धक भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतील असा विश्वास मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे (एमएसबीबीएफए) अध्यक्ष अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला. मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस (एमएसबीबीएफए) आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्या (जीबीबीबीए) संयुक्त आयोजनाखाली ही स्पर्धा रंगणार असून जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने एक लाखांपेक्षा अधिक रोख बक्षीसांचा वर्षाव विजेत्यांवर केला जाणार आहे. एकंदर सहा गटांच्या या स्पर्धेचा विजेता 11 हजार रूपयांच्या रोख पुरस्काराचा मानकरी ठरेल, अशीही माहिती जीबीबीबीएचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली.
*ज्यूनियर खेळाडूंची कसून तपासणी होणार*
वय चोरून खेळणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंना रोखण्यासाठी संघटनेने ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आपण 21 वर्षाखालील असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. याकरिता त्यांना वयाचे दाखले म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि जन्माचा दाखला यापैकी कोणतेही दोन पुरावे मुळ पत्र आणि झेरॉक्स प्रतसह आणणे बंधनकारक असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेत खेळणारा स्पर्धक 4 जानेवारी 1999 सालानंतर जन्मलेला असला पाहिजे तर मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत उतरणारा स्पर्धक 4 जानेवारी 1980 पूर्वी जन्मलेला असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. जे खेळाडू आपल्या जन्माचे पुरावे सादर करू शकणार नाहीत त्यांना स्पर्धेत भाग घेता येणार नसल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.
*वजन आणि उंची तपासणी शुक्रवारी*
स्पर्धेत खेळाडूंचा प्रतिसाद पाहाता संघटनेने 4 जानेवारीला रंगणाऱ्या स्पर्धेची वजन तपासणी आणि उंची तपासणी शुक्रवारी 3 जानेवारीला सायंकाळी 5 ते 7 यावेळेत फाॅरच्यून फिटनेस, अंधेरी पूर्व येथे केले जाणार आहे. ज्यूनियर मुंबई श्री, मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत खेळणारे खेळाडूंची वजन तपासणी तसेच नवोदित मुंबई श्रीत सामील होणारे फिटनेस फिजीक या खेळाडूंनी उंची तपासणीसाठी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन एमएसबीबीएफएचे सरचिटणीस सुनील शेगडे यांनी केलेय. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश सावंत (9867209971), सुनील शेगडे (9223348568), प्रभाकर कदम (8097733992),आणि विजय झगडे (9967465063) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जीबीबीबीएचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी केले आहे.