कबड्डी : स्वस्तिक क्रीडा मंडळाचा डबल धमाका; दोन जेतेपदावर कोरले नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 05:53 PM2019-11-27T17:53:16+5:302019-11-27T17:53:45+5:30
पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
मुंबई :- स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” पुरुष आणि कुमार गटाचे विजेतेपद पटकावत “डबल धमाका” केला. आज उपनगर कबड्डी स्पर्धेचा अंतिम दिवस. नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यांतराला १८-०६ अशी आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकने मध्यांतरानंतर देखील आपला जोश कायम ठेवत जॉलीला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. स्वस्तिकच्या विजयाचे श्रेय सुयोग राजापकरच्या आक्रमक चढाया आणि अभिषेक चव्हाण यांच्या धाडशी पकडीला जाते. जॉलीच्या श्रीकांत बिर्जे, सचिन सावंत यांना या सामन्यात सूर सापडला नाही.
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने अंबिका सेवा मंडळाला ३४-१८ असा पाडाव करीत या गटाच्या जेतेपदा बरोबर “डबल धमाका” उडवून दिला. पहिल्या डावात २०-०२ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकला दुसऱ्या डावात अंबिकाने कडवी लढत देत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. ही आघाडी कमी करण्यात त्यांना यश आले खरे, पण संघाचा विजय साजरा करण्यात ते कमी पडले. स्वस्तिकच्या या विजयाचे श्रेय सिद्धेश पांचाळ, हृतिक कांबळे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. अंबिकाच्या शुभम दिडवाघ, शुभम सुतार यांच्याकडून संघाच्या विजयाचे प्रयत्न तोकडे पडले.
किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सुरक्षा क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सला ५१-३८ असे लीलया नमवित या गटाचे विजेतेपद संपादन केले. विश्रांतीला २२-१९ अशी आघाडी घेणाऱ्या सुरक्षाने विश्रांतीनंतर देखील जोरदार प्रतिकार करीत हा विजय साकारला. आदित्य अंधेर, उदित यादव यांच्या अष्टपैलू खेळाला सुरक्षाच्या या विजयाचे श्रेय जाते. त्यांच्या या झंजावातामुळे त्यांनी गुणांचे अर्धशतक पार केले. जॉलीच्या दिनेश यादव, रजत राजकुमार सिंग यांनी कडवी लढत दिली. या पराभवामुळे त्यांना यंदा पुरुष आणि किशोर अशा दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
किशोरी गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने आकाश स्पोर्ट्स क्लबचे आव्हान ४२-३४ असे संपवित या गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. याशिका पुजारी, आरती मुंगुटकर यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत स्वराज्यला २८-१२ अशी आश्वासक आघाडी घेऊन दिली होती. उत्तरार्धात मात्र आकाशच्या आकांक्षा बने, कल्पिता शेवाळे यांनी आपला खेळ अधिक गतिमान करीत सामन्यात चुरस निर्माण केली. पण विज्यापासून ते खूप मागे राहिले.