कबड्डी : महात्मा गांधी विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स संघांत अंतिम लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 09:53 PM2019-11-22T21:53:48+5:302019-11-22T21:54:57+5:30
उपांत्य सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने महात्मा फुले स्पोर्ट्स क्लबचा प्रतिकार ४१-११ असा सहज संपुष्टात आणले.
महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स क्लब यांनी मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमारी गटात अंतिम फेरीत धडक दिली. तर व्दितीय (ब) श्रेणी पुरुष गटात ओवळी क्रीडा मंडळ, साई सेवा क्रीडा मंडळ, गुरुदत्त मंडळ यांनी उप-उपांत्यपूर्व (फ्री-कॉटर) फेरी गाठली. नेहरू नगर – कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमारी गटाच्या उपांत्य सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने महात्मा फुले स्पोर्ट्स क्लबचा प्रतिकार ४१-११ असा सहज संपुष्टात आणत आपणच या गटातील विजेतेपदाचे दावेदार आहोत हे अघोरखीत केले. दोन्ही डावात आक्रमक व जोशपूर्ण खेळ करीत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोटातील हवाच काढून टाकली. महात्मा गांधींच्या मध्यांतराला २४-०५ अशी भक्कम आघाडी घेतली होती. तेजस्वीनी गिलबिले, ग्रंथाली हांडे यांच्या जोशपूर्ण खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महात्मा फुलेची शुभदा खोत बरी खेळली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात संघर्ष स्पोर्ट्स क्लबने चुरशीच्या लढतीत स्वराज्य स्पोर्ट्स क्लबचे कडवे आव्हान २७-२३ असे मोडून काढले. कोमल यादव, पूजा विनेरकर यांच्या आक्रमक खेळाने संघर्षने विश्रांतीला २९-०७ अशी भक्कम आघाडी घेतली होती. यामुळे उत्तरार्धात त्यांनी सावध खेळ करीत आहे ती आघाडी टिकविण्यावर भर दिला. याचा फायदा घेत स्वराज्यच्या सिद्धी ठाकूर, काजल खैरे यांनी आपले आक्रमण धारदार करीत गुण वसूल केले. पण संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात त्या अपयशी ठरल्या. या अगोदर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामान्य महात्मा गांधी स्पोर्ट्सने तेजस्वीनी स्पोर्टसला १६-१३; महात्मा फुले स्पोर्टसने चेंबूर क्रीडा केंद्राला २५-१९; संघर्ष स्पोर्ट्सने राजमुद्रा स्पोर्टसला ३६-११; तर स्वराज्य स्पोर्टसने जगदंब क्रीडा मंडळाला २१-१२ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली होती.
पुरुष व्दितीय (ब) गटाच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात ओवळी क्रीडा मंडळाने ओमकार सपकाळ, शुभम शिंदे यांच्या चढाई-पकडीच्या धुव्वादार खेळाच्या जोरावर सिद्धदत्त कबड्डी संघाचा ३७-०७ असा पाडाव केला. मध्यांतारालाच विजयी संघाकडे २३-०३ अशी मोठी आघाडी होती. दुसऱ्या सामन्यात साईदत्त सेवा क्रीडा संघाने एन. पी. स्पोर्ट्सवर २२-१८ असा विजय मिळविला. प्रसाद चिकटे, राज दयानिधी यांनी संयमी व सावध खेळ करीत साईदत्तला विश्रांती पर्यंत ८-४ अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. विश्रांतीनंतर आहे ती आघाडी ठिकविण्यावर भर देत त्यांनी उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. एन. पी. स्पोर्टसकडून राहुल वेताळ, विवेक पाणकर यांनी अंतिम क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. याच गटातील शेवटच्या सामन्यात गुरुदत्त मंडळाने सुरक्षा प्रबोधिनीला २१-१९ असे चकविता उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात ०६-१० अशा पिछाडीवर पडलेल्या गुरुदत्तने दुसऱ्या डावात मात्र टॉप गिअर टाकत बाजू पलटविली. या स्वप्नावत विजयाचे श्रेय वैभव मुरकर, मंगेश कदम यांच्या चढाई-पकडीच्या चतुरस्त्र खेळाला द्यावे लागेल. सुरक्षा प्रबोधिनी कडून दीपक रिकामे, हर्षल सुर्वे यांच्या उत्कृष्ट खेळ संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला.