खेलो इंडिया युथ गेम्सच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणातही सुवर्णपदकांची लयलूट कायम राखली. त्यांच्या अपेक्षा फर्नान्डिसने १७ वर्षाखालील गटात ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यत ५ मिनिटे १२.१९ सेकंद अशा विक्रमी वेळेत पार केली. यापूर्वी तिने गतवर्षी ५ मिनिटे १३ सेकंद असा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. ती मुंबई येथे मोहन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याच वयोगटात गतवर्षी पुण्यातील स्पर्धा गाजविणाऱ्या केनिशा गुप्ता हिने येथे १०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे सुवर्णपदक पटकाविले. हे अंतर तिने ५९.१४ सेकंदांत पूर्ण केले.
मुलांच्या २१ वर्षांखालील गटात मिहिर आम्ब्रे याने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने १०० मीटर्स बटरफ्लाय शर्यत ५४.९१ सेकंदांमध्ये जिंकली. पाठोपाठ त्याने आपल्या संघास ४ बाय १०० मीटर्स मिडले रिलेमध्येही विजेतेपद मिळवून दिले. मिहिर आम्ब्रे, सुचित पाटील, रुद्राक्ष मिश्रा व एरॉन फर्नान्डिस यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत ३ मिनिटे ५६.८३ सेकंदांत पार केली. १७ वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्रास या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे अंतर ४ मिनिटे ४.७३ सेकंदांत पूर्ण केले.
मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या एरॉन फर्नान्डिस व सुश्रुत कापसे यांनी ४०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा तळेगावकर (१९ मिनिटे २१.७३ सेकंद) व मैत्रेयानी भोसले (२० मिनिटे ३४.७० सेकंद) यांनी १५०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक पटकाविले.
वेटलिफ्टिंगमध्ये प्राजक्ता, किरण व अभिषेकला सुवर्णवेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या प्राजक्ता खालकर हिने कनिष्ठ विभागातील ६४ किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये ८१ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १०० किलो असे एकूण १८१ किलो वजन उचलले. कनिष्ठ मुलांच्या ७३ किलो गटांत महाराष्ट्राच्या अभिषेक निपणे याने सोनेरी कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १५४ किलो असे एकूण २६८ किलो वजन उचलले. त्याचाच सहकारी गणेश बायकर याला याच गटात ब्राँझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये १०५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४० किलो असे एकूण २४५ किलो वजन उचलले. युवा विभागाच्या ७३ किलो गटात महाराष्ट्राचा किरण मराठे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने स्नॅचमध्ये १११ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४० किलो असे एकूण २५१ किलो वजन उचलले. तो जळगाव येथे योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
टेनिसमध्ये संमिश्र यशटेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना संमिश्र यश मिळाले. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या ध्रुव सुनीश याने एम. शशांक याचे आव्हान ६-१, ६-१ असे एकतर्फी तढतीत संपुष्टात आणले. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने हरियाणाच्या अंजली राठी हिचा ६-०, ६-२ असा दणदणीत पराभव केला. मात्र तिची सहकारी सई भोयार हिला कर्नाटकच्या रेश्मा मयुरीने तिला ६-२, ६-४ असे पराभूत केले.