खेलो इंडिया : जलतरणात महाराष्ट्र संघाची आगेकूच कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 04:33 AM2020-01-22T04:33:53+5:302020-01-22T04:34:21+5:30
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला. अपेक्षा फर्नांडिस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले.
गुवाहाटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला. अपेक्षा फर्नांडिस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले.
अपेक्षाने १७ वषार्खालील मुलींच्या २०० मी. बटरफ्लाय व ५० मी.ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सुुवर्णपदक मिळवले. याच शर्यतीत महाराष्ट्राच्या करिना शांता (३५.११ सेकंद) व झारा जब्बार (३५.४२ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्प पदकाची कमाई केली. केनिशाने १७ वर्षाखालील गटात ५० मीटर्स फ्रीस्टाईलमध्ये विजेतेपद पटकाविले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात मिहिरने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकली. रुद्राक्ष मिश्रा याने कांस्य पदक मिळवले. २१ वषार्खालील गटात रुद्राक्ष, मिहिर, सुचित पाटील व एरॉन फर्नांडिस यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ४ बाय १०० मीटर्स फ्रीस्टाईल रिले जिंकली.
जळगावच्या दिशा पाटीलने १७ वर्षांखालील ६३ किलो मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तिने अंतिम सामन्यात हरयणाच्या रुद्रिका कंडू हिला पराभूत केले. त्याचवेळी औरंगाबादच्या शर्वरी कल्याणकरला ७० किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दिशाने अंतिम फेरीत रुद्रिकाचे कडवे आव्हान सहज परतावून लावत बाजी मारली. दुसरीकडे, अटीतटीच्या अंतिम सामन्यात शर्वरीला हरयाणाच्या माही राघवकडून २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)