खेलो इंडिया : जलतरणात आणखी तीन सुवर्णपदकंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:29 PM2020-01-20T22:29:53+5:302020-01-20T22:31:00+5:30

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य ; टेनिसमध्ये आगेकूच

Khelo India: Three more gold medals in swimming for Maharashtra | खेलो इंडिया : जलतरणात आणखी तीन सुवर्णपदकंची कमाई

खेलो इंडिया : जलतरणात आणखी तीन सुवर्णपदकंची कमाई

Next

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने जलतरणातील पदकांची लयलूट कायम राखताना तीन सुवर्ण, दोन रौप्य व एका ब्राँझपदकाची भर घातली. 


केनिशा गुप्ताने मुलींच्या १७ वर्षाखालील गटात २०० मीटर्स वैयक्तिक मिडले रिले शर्यत २ मिनिटे २५.८० सेकंदांत जिंकली. तिचीच सहकारी अपेक्षा फर्नान्डीस हिने रौप्यपदक पटकाविले. तिने हे अंतर २ मिनिटे २९.२५ सेकंदांत पार केले. याच वयोगटात केनिशा व अपेक्षा यांनी करिना शांता व पलक धामी यांच्या साथीत ४ बाय १०० मीटर्स मिडले रिले शर्यतीचेही सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी हे अंतर ४ मिनिटे २९.५९ सेकंदांत पूर्ण केले. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राला या शर्यतीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या वेदांत बापना याने २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. त्याने ही शर्यत २ मिनिटे १०.८५ सेकंदांत पार केली. याच वयोगटात सुश्रुत कापसे याने ८०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. त्याला हे अंतर पार करण्यास ८ मिनिटे ५२.७४ सेकंद वेळ लागला.

*वेटलिफ्टिंगमध्ये रितेशला रौप्यपदक
महाराष्ट्राच्या रितेश म्हैसाळ याने युवा गटाच्या ८९ किलो विभागात रौप्यपदक मिळविले. त्याने स्नॅचमध्ये ११२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३६ किलो असे एकूण २४८ किलो वजन उचलले. त्याचाच सहकारी सानिध्य मोरे याला याच विभागात ब्राँझपदक मिळाले. त्याने अनुक्रमे १०९ व १३४ किलो असे एकूण २४३ किलो वजन उचलले. 
मुलींच्या युवा ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या श्रेया गणमुखी हिने रौप्यपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ७३ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८९ असे एकूण १६२ किलो वजन उचलले. कनिष्ठ मुलींच्या ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या करुणा गढे हिला ब्राँझपदक मिळाले. तिने स्नॅचमध्ये ६४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८६ असे एकूण १५० किलो वजन उचलले.

*टेनिसमध्ये ध्रुव व आकांक्षा अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या ध्रुव सुनीश याने मुलांच्या २१ वर्षाखालील एकेरीत तर आकांक्षा नित्तुरे हिने १७ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली. ध्रुव याने उपांत्य फेरीत राजस्तानच्या फैसल कमार याचे आव्हान ६-२, ३-६, ६-३ असे संपुष्टात आणले. आकांक्षा हिने तेलंगणाच्या संजना सिरिमाला हिचा २-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर तिने पासिंग शॉट्स व बिनतोड सर्व्हिस असा बहारदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. 


मुलींच्या २१ वर्षाखालील गटात स्नेहल माने व मिहिका यादव यांनी अंतिम फेरी गाठली. त्यांनी मुस्कान दहिया व जेनिफर लुईखा यांच्यावर ६-१, ७-६ (७-२) असा विजय मिळविला. मुलांच्या १७ वषार्खालील गटात दक्ष अगरवाल व यशराज दळवी यांनी दुहेरीत अंतिम फेरी गाठली. त्यांना योगी पन्ना व करणसिंग यांच्याकडून पुढे चाल मिळाली.

Web Title: Khelo India: Three more gold medals in swimming for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.