खो-खो : पुरुषांमध्ये नवमहाराष्ट्र, हिंदकेसरी, विहंग उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 04:52 PM2018-12-13T16:52:03+5:302018-12-13T16:52:43+5:30
महिलांमध्ये शिवभक्त वि. आर्यन व नरसिंह वि. नाईक उपांत्य फेरीत लढणार
ठाणे, १३ डिसें. (क्री. प्र.) महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील धर्मवीर क्रीडासंकुलात राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष व महिला गटाच्या खो खो स्पर्धेत आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत चुरशीचे सामने पाहायला मिळाले. या स्पर्धेत पुरुषांमध्ये नवमहाराष्ट्र वि. हिंदकेसरी व विहंग वि महात्मा गांधी तर महिलांमध्ये शिवभक्त विरुद्ध आर्यन व नरसिंह विरुद्ध नाईक उपांत्य फेरीत लढणार.
आज झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने मुंबईच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा १९-११ असा आठ गुणांनी पराभव केला. नवमहाराष्ट्राच्या अक्षय गणपुलेने तीन मिनिटे, दोन मिनिटे संरक्षण करत एक गडी बाद केला; प्रतीक वाईरकरने दोन मिनिटे चाळीस सेकंद, एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले; सुयश गरगटेने दोन मिनिटे संरक्षण करत तीन गडी बाद केले; मिलिंद कुरपेने नाबाद एक मिनिट संरक्षण करताना चार गडी बाद केले व सागर लेंगरेने एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करताना चार गडी बाद केले व विजयात मोलाचा वाटा उचलला. सरस्वतीच्या रोहन टेमकरने दोन मिनिटे दहा सेकंद व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण केले, श्रेयस राऊळने एक मिनिट चाळीस सेकंद, दोन मिनिटे संरक्षण करताना चार गडी बाद केले तर चैतन्य धुळेपने चार गडी बाद करत जोरदार लढत दिली मात्र ते या लढतीत अपयशीच ठरले.
सांगलीच्या हिंदकेसरी संघाने उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळचा १५-१० असा एक डाव पाच गुणांनी धुव्वा उडवला. हिंदकेसरीच्या दीपक मानेने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण करत एक गडी बाद केला; अमोल जाधवने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत दोन गडी बाद केले;मिलिंद चावरकरने एक मिनिट पन्नास सेकंद संरक्षण करत चार गडी बाद केले व विजय सुकर केला तर छत्रपतीच्या लखन चव्हाण, सनी नाईकवडी व कृष्णा राठोड यांनी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले.
आणखी एका झालेल्या सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्स ऍकॅडमीने प्रबोधन क्रीडाभवन मुंबई उपनगरचा १३-१२ असा एक गाव एक गुणांनी धुव्वा उडवला. महात्मा गांधीच्या प्रतीक देवरने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करत एक गडी बाद केला, दीपक माधवने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व दीपेश मोरेने एक मिनिट वीस सेकंद, एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करताना दोन गडी बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केले तर प्रबोधनच्या प्रमोद तेली, सागर घाग व किरण कांबळे यांनी चांगली लढत दिली मात्र ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.
विहंग क्रीडा मंडळाने ग्रिफिन जिमखाना ठाणे चा १७-१२ असा पाच गुणांनी पराभव केला. विहंग च्या महेश शिंदेने दोन मिनिटे पन्नास सेकंद, दोन मिनिटे संरक्षण करत एक गडी बाद केला गजानन शेंगाळने एक मिनिट पन्नास मिनिटे संरक्षण करताना तीन गडी बाद केले व रंजन शेट्टी ने चार गडी बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर ग्रिफिनच्या आकाश तोरणे, आदित्य कांबळे, ज्ञानेश्वर कंक, यांनी चांगला खेळ केला मात्र ते काही आपल्या संघाला विजयश्री खेचून आणू शकले नाही
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याच्या शिवभक्त विद्या मंदिर ने साताऱ्याच्या साखरवाडी क्रीडा मंडळाचा १०-७ असा एक डाव तीन गुणांनी धुवा उडवला. शिवभक्तच्या प्रियंका भोपीने पाच मिनिटे संरक्षण करताना दोन बळी घेतले. रेशमा राठोडने तीन मिनिटे संरक्षण केले व प्रतिक्षा म्हात्रेने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करताना दोन बळी घेतले, मीनल भोईरने एक मिनिट वीस सेकंद संरक्षण करताना दोन बळी घेतले. तर साखरवाडीच्या पूजा फडतरेने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण करताना चार बळी घेतले, पूजा वैद्याने एक मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले व प्रांजल माडकरने एक मिनिट पन्नास संरक्षण करताना एक बळी मिळवला मात्र त्या आपल्या संघाला विजयश्री मिळवून देऊ शकले नाहीत.
ठाण्याच्या रा. फ. नाईक विद्यालयाने अहमदनगरच्या एकलव्य क्रीडा मंडळावर ११-८ असा एक डाव तीन गुणांनी मोठा विजय साजरा केला. नाईक विद्यालयाच्या प्रणाली मगरने दोन मिनिटे संरक्षण केले, रूपाली बडेने तीन मिनिटे संरक्षण करत दोन बळी मिळवले, पोर्णिमा सकपाळने दोन मिनिटे संरक्षण केले तर मृणाल कांबळेने 1:00, 1:30 मि. संरक्षण करत तीन बळी मिळवले व विजयात सिंहाचा वाटा उचलला. एकलव्यच्या ऋतुजा शेकडे,आरती लगड व कांचन पांडुळे यांनी चांगला खेळ केला मात्र ते आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाहीत.
पुण्याच्या नरसिंह क्रीडा मंडळाने राजश्री शाहू महाराज विद्यालयावर १२-७ असा एक डाव पाच गुणांनी विजय संपादन केला. नरसिंहाच्या स्नेहल जाधवने चार मिनिटे चाळीस सेकंद, एक मिनिट दहा सेकंद संरक्षण करत तीन बळी मिळवले, ऋतुजा भोरने तीन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले व तेजल जाधवने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर राजश्रीच्या अश्विनी मोरे, कांचन हलगरे यांनी चांगली लढत दिली मात्र त्या काही आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत.
आणखी एका सामन्यात रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबने उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळवर १०-८ असा दोन गुणांनी निसटता विजय संपादन केला. रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतने तीन मिनिटे, तीन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत एक बळी मिळविला; अपेक्षा सुताराने दोन मिनिटे, एक मिनिट संरक्षण करत दोन बळी मिळवले; तन्वी कांबळेने एक मिनिटे पन्नास सेकंद, दोन मिनिटे संरक्षण करत दोन बळी मिळवले, गौरी पवारने 4 बळी मिळवले व विजय सुकर केला. तर उस्मानाबादच्या सारिका काळेने तीन मिनिटे दहा सेकंद, एक मिनिट पन्नास सेकंद संरक्षण करत दोन बळी मिळवले,जानवी पेठेने एक मिनिट पन्नास सेकंद, दोन मिनिटे संरक्षण करत एक बळी मिळविला, प्राची जटनुरेने दोन मिनिटे, एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले मात्र ते आपल्या संघाचा विजय साजरा करू शकल्या नाहीत.