खो खो : श्री समर्थाला दुहेरी मुकुट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 10:09 PM2019-06-12T22:09:45+5:302019-06-12T22:10:40+5:30
अटीतटीच्या झुंजीत समर्थने जिंकल्या दोन्ही लढती
मुंबई खो खो संघटना आयोजित व लायन्स क्लब ऑफ माहीम यांच्या सहकार्याने कुमार मुली गटाची जिल्हा अजिंक्यपद खोखो स्पर्धा आज संपन्न झाली. आज झालेल्या कुमार गटांच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर , दादर विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीम हा सामना (०६-०८-०७-०५) १३-१३ असा समान गुण असताना पंचांच्या निर्णयावर नाखुषी दाखवत सरस्वती स्पोर्ट्स क्लब यांनी डाव सोडला त्यामुळे पंचांनी श्री समर्थाला विजयी घोषित केले. मध्यांतराला सरस्वती कडे नाममात्र दोन गुणाची आघाडी होती. मात्र श्री समर्थच्या प्रतीक होडावडेकर याने ४:२० मिनिटे संरक्षण करत सामन्यात जीव ओतला व सामना अधिक रंगतदार होत गेला. सरस्वती ला शेवटच्या पाळीत ६ गुणांपर्यंत संरक्षण अडवायचे होते मात्र बरोबरीचा ७ वा गुण सामना संपण्यास २ सेकंड राहिले असताना श्री समर्थच्या जयेश नेवरेकर याने मारला आणि सामना बरोबरीत आला. मात्र बरोबरीच्या गुणा बाबत पंचांच्या निर्णयावर नाखुषी दाखवत सरस्वती स्पोर्ट्स क्लब यांनी डाव सोडला त्यामुळे जाडा डाव ना खेळता श्री समर्थाच्या संघाला विजयी घोषित करण्यात आले. श्री समर्थ तर्फे वरद फाटक याने १:४० , नाबाद २:४०, मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला. प्रतीक होडावडेकर याने ०:५० ; ४:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केले तर जयेश नेवरेकर याने आक्रमणात तीन गडी बाद केले. सरस्वतीतर्फे राहुल जावळे याने ३:३० , २.४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन गडी बाद केले. , करण गारोळे याने १:३० , १:४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी बाद केले तर आकाश शिंदे याने आक्रमणात चार गडी बाद केले.
मुलींच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर , दादर या संघाने शिवनेरी सेवा मंडळ, दादर या संघाचा (०५-०५-०८-०५) १३-१० असा तीन गुणाने पराभव केला. मध्यंतराला सामना समान गुणांवर होता. मात्र मध्यंतरानंतर श्री समर्थाच्या मुलींनी धारधार आक्रमण करत ८ गुण वसूल करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. समर्थच्या संघातर्फे भक्ती धांगडे हिने ३:००; १:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार गडी बाद केले. तर प्राजक्ता ढोबळे हिने आक्रमणात तीन गडी मिळवले, तृष्णा उंबरकर हिने ०:३०, २:५० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ३ गडी बाद केले तर अनघा साळवी हिने २:४०, १:४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला तर शिवनेरीतर्फे वैभवी अवघडे हिने २:१० , २:३० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात एक गडी बाद केला. प्रतीक्षा महाजन हिने २:०० , ०:४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार गडी बाद केले. तर सायली म्हैसधुणे हिने २:५० मिनिटे संरक्षण केले.
कुमार गटात तिसरा क्रमांक विद्यार्थी क्रीडा केंद्र याने मिळवला तर चौथा ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर च्या मुलांनी मिळवला. मुलींमध्ये तिसरा क्रमांक सरस्वती कन्या संघ तर चतुर्थ क्रमांक ओम साईश्वर सेवा मंडळ च्या मुलींनी मिळवला.
कुमार गट
अष्टपैलू खेळाडू :- राहुल जावळे
सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडू :- प्रतीक होडावडेकर
सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडू :- जयेश नेवरेकर
मुली गट
अष्टपैलू खेळाडू :- भक्ती धांगडे
सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडू :- वैभवी अवघडे
सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडू :- प्राजक्ता ढोबळे