ठाणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील धर्मवीर क्रीडासंकुलात राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष व महिला गटाच्या खो खो स्पर्धेत आज काही चुरशीचे सामने पाहायला मिळाले. आज झालेल्या महिलांच्या ड गटातील सामन्यात उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने मुंबई उपनगरच्या परांजपे स्पोर्ट्स क्लबचा १०-६ असा एक डाव चार गुणांनी धुव्वा उडवला. छत्रपतीच्या जान्हवी पेठेने चार मिनिटं संरक्षण केले, निकिता पवारने तीन मिनिटे संरक्षण करत दोन बळी घेतले, सारिका काळेने नाबाद दोन मिनिटे संरक्षण करताना दोन बळी घेतले तर किरण शिंदे दोन मिनिटे संरक्षण करताना तीन बळी घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. परांजपेच्या आरती कदम व श्रुती सकपाळने प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण केले तर रचना जुवेकरने एक मिनिट विस सेकंद संरक्षण करताना एक बळी घेतला मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.
महिलांच्या अ गटातील अहमद नगरच्या एकलव्य क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडेमीचा ११-७ असा चार गुणांनी पराभव केला. एकलव्यच्या ऋतुजा शेकडेने ३:४०, ५:५० मिनिटे संरक्षण करताना दोन बळी घेतले, वैष्णवी पालवेने २:५०, १:३० मि.संरक्षण करताना एक बळी घेतला, तर ऋतुजा गोपाळघरेने तीन बळी घेत विजयश्री सहज खेचून आणली. महात्मा गांधीच्या ३:५०, २:४० मिनिटेसंरक्षण करताना दोन बळी घेतले, आकांक्षा कौचेने २:००, १:१० मिनिटे संरक्षण केले तर मिताली बारसकरने १:४०, ३:२० मिनिटे संरक्षण करताना चार बळी घेतले मात्र त्या आपल्या संघासाठी तारणहार ठरू शकल्या नाहीत.
आज झालेल्या पुरुषांच्या ड गटातील सामन्यात उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने मुंबईच्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर १८-१३ असा ५ गुणांनी विजय संपादन केला. उस्मानाबादच्या कृष्णा राठोडने २:२०, २:०० मिनिटे संरक्षण केले, संकेत गायकवाडने २:१०, २:०० मिनिटे संरक्षण केले तर अविनाश मतेने ४ गडी बाद करत धक्कादायक विजयाची नोंद केली. तर ओम समर्थच्या आशीतोष शिंदेने २:१० मिनिटे संरक्षण करताना १ गडी बाद केला. सनी तांबेने १:५०, २:३० मिनिटे संरक्षण केले. अंकित निंबरेने १:३० मिनिटे संरक्षण करताना ५ गडी बाद केले मात्र ते आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणू शकले नाहीत.
आज झालेल्या पुरुषांच्या क गटातील सामन्यात कवठे पिरानच्या हिंदकेसरी संघाने सोलापूरच्या दीनबंधू खो-खो संघाचा १३-९ असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवला. हिंदकेसरीच्या उत्तम सावंतने २:५० मि. संरक्षण केले, दीपक मानेने ३:१० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले,सत्यविजय सावंतने २:३० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले व विजय सुकर केला. तर दीनबंधूच्या श्रीकांत खट्टे, नदाफ आदींनी चांगला खेळ केला.