विशाखापट्टणम : सलग दोन विजयामुळे कोलकाता नाईट राइडरचा (केकेआर) संघ चांगला बहरात असून, विजयाची हॅॅट््ट्रिक साधण्यासाठी ते मैदानात उतरतील. दिल्ली विरुद्ध केवळ चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला असल्याने काहीसा दबाव सनरायझर्स हैदराबाद संघावर असेल. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून संघाला पुन्हा लयीत आणण्यासाठी हैदराबादला ही संधी असेल. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दिल्ली डेअरडेविल्सला पराभूत केले आहे. केकेआरने चार सामन्यांत तीन विजय व एक पराभव पत्करला असून, गुणतालिकेत हा संघ चौथ्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबादला चार सामन्यांत तीन वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे, तर एका सामन्यात त्यांना विजय मिळविता आला आहे. गुणतालिकेत हैदराबाद सहाव्या स्थानावर आहेत. हैदराबादच्या संघाची मदार ही परदेशी खेळाडूंवर आहे. तसेच कर्णधार डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन संघाला चांगली सुरुवात देण्यास अपयशी ठरले आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्यांची मधली फळीदेखील कोलमडली होती. दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन, भुवनेश्वर कुमार यांच्यावर गोलंदाजीची मदार आहे. दुसरीकडे केकेआरने गत चार सामन्यांत चांगली खेळी केली असल्याने त्यांचे पारडे काहीसे जड आहे. गौतम गंभीर व युसूफ पठाण यांनी संघासाठी सुरेख फलंदाजी केली आहे. उमेश यादव व मोर्ने मॉर्केल ही दोन गोलंदाजीची प्रमुख अस्त्रे त्यांच्या भात्यात आहेत.
केकेआर विजयाची हॅट्ट्रिक साधणार?
By admin | Published: April 22, 2015 3:06 AM