कोलकाता : विजयी हॅटट्रिकच्या इराद्यानेच मैदानात उतरलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी चांगलाच ‘ब्रेक’ लावला. त्यामुळेच दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४६ धावापर्यंत मजल मारता आली. कोलकात्याकडून मोर्नी मोर्केल, आंद्रे रसेल, पियूष चावला ‘त्रिकुटाने’ प्रत्येकी दोन बळी घेतले. दिल्लीच्या मनोज तिवारीने केलेली ३२ धावांची खेळी सर्वाधिक ठरली. ‘होम ग्राउंड’वर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूंवर गेल्या सामन्यात शानदार खेळी करणारा मयंक अग्रवाल बाद झाला. त्याला मोर्केलने यादवकरवी झेलबाद केले. मयंकचे लवकर बाद होणे दिल्लीसाठी धक्कादायक ठरले. त्यानंतर आक्रमक फलंदाज जे. पी. ड्युमिनी (५) याला सुनील नरीनने चकवले. जोरदार फटका मारण्याच्या नादात त्याचा त्रिफळा उडला. तो बाद झाल्याने दिल्ली ४.३ षटकांत २ बाद २२ अशा संकटात सापडली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी दिल्ली फलंदाजांना एकप्रकार जखडूनच ठेवले होते. अशावेळी एस. अय्यर आणि मनोज तिवारी या जोडीने ३६ धावांची भागीदारी करीत दिल्लीचे अर्धशतक गाठले. मात्र सेट झालेल्या अय्यरचा चावलाने त्रिफळा उडवत पुन्हा भांबेरी उडवली. अय्यर २४ चेंडंूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा काढून तंबूत परतला. तो बाद झाल्यानंतर दिल्लीची मोठी आशा युवराजसिंगवर होती. युवराजने दोन चौकार ठोकत तसा विश्वासही दाखवला होता. त्याने १९ चेडंूत २१ धावा केल्या. यात एका षटकाराचाही समावेश होता. मात्र पियूषच्या फिरकीच्या जाळ्यात युवराज अडकला. फटका मारण्याच्या नादात तो यष्टिचित झाला. त्याआधी, ३२ धावा करणारा मनोज तिवारीसुद्धा बाद झाला. दिल्लीचे फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद होत गेले. त्यामुळे त्यांना धावगती सुद्धा वाढवता आली नाही. मॅथ्यूजने २१ चेंडूंत २८ धावा फटकारल्या. केदार जाधवने १२ धावांचे योगदान दिले. कोलकात्याकडून सुनील नरीनने एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)