नवी दिल्ली : भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांचे आयोजन होत नसल्यामुळे दर्जेदार टेनिसपटू निर्माण होत नाहीत, असे मत महान टेनिसपटू रमेश कृष्णन यांनी व्यक्त केले. भविष्यातील चॅम्पियन तयार करण्यासाठी खेळाचा प्रचार व प्रसार देशाच्या काना-कोपऱ्यात होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.१९८७ मध्ये आॅस्ट्रेलियाचा पराभव करीत भारताला डेव्हिस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रमेश कृष्णनला भारतीय खेळाडूंमधील उणिवांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘ती वेळ वेगळी होती. त्या वेळी भारतीय टेनिस वर्तुळ विश्व टेनिसचा महत्त्वाचा भाग होते. प्रत्येक तीन-चार महिन्यांत येथे चांगल्या स्पर्धेचे आयोजन होत होते. त्यामुळे अधिक पैसा खर्च होत नव्हता, पण आता सर्व स्पर्धा युरोपमध्ये होत आहेत. त्यामुळे युरोपला चांगला लाभ मिळत आहे. भारतीय खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो. ही खर्चिक बाब आहे. येथे अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन झाले तर युवा खेळाडूंना कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल.’’ १९७९ मध्ये विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेत ज्युनिअर गटात जेतेपद पटकावणारे आणि जागतिक क्रमवारीत ज्युनिअर गटात अव्वल स्थान भूषवलेले खेळाडू असलेले रमेश म्हणाले, ‘‘त्या वेळी येथे मोठ्या स्पर्धा होत होत्या. युरोपमध्ये वर्षांतील काही महिने टेनिस होत होते.’’महान खेळाडू रामनाथन कृष्णनचे पुत्र असलेल्या रमेश यांनी १९८० च्या दशकात तीन ग्रॅण्डस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. १९८५ मध्ये त्यांनी जागतिक क्रमवारीत २३ वे स्थान पटकावले होते. रमेश म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडू आता अनेक खेळांमध्ये चमकदार कामगिरी करीत आहेत. बॅडमिंटनमध्ये आपली कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. सर्व खेळांमध्ये खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांसोबत संघर्ष करावा लागत आहे. भारतीय क्रीडा वर्तुळासाठी ही चांगली बाब आहे. टेनिसमध्ये युवा खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी योजना तयार करणे आवश्यक आहे.’’ भारताचे आघाडीचे टेनिसपटू सोमदेव देववर्मन व युकी भांबरी यांच्याबाबत बोलताना रमेश म्हणाले, ‘‘सोमदेव चांगला खेळत आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला असेल, असे मला वाटत नाही. भारतासाठी ही दुर्दैवाची बाब आहे. युकीने काही चांगले विजय मिळवले आहे.’’ (वृत्तसंस्था)
भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांची उणीव
By admin | Published: March 31, 2015 11:17 PM