महेश पाळणे
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : क्रीडा क्षेत्राला लातूरने अनेक रत्ने दिली आहेत. हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार व माजी ऑलिम्पियन कॅप्टन शाहूराज बिराजदार यांनी लातूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आगामी टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग क्रीडा प्रकारात लातूरचे सुपुत्र शाहूराज बिराजदार यांचे दोन शिष्य भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी बजावत आहेत.
निलंगा तालुक्यातील हरिजवळगा येथील मूळचे असलेले कॅप्टन शाहूराज बिराजदार यांचे बॉक्सिंग खेळात योगदान आहे. सेऊल ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत लातूरचे नाव उज्ज्वल केले होते. १२ जागतिक स्पर्धेत त्यांनी विजय प्राप्त केला आहे. आशियाई स्पर्धेत रौप्य, तर कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. केंद्र शासनाचा ध्यानचंद पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. पुणे येथे सैन्य दलात कार्यरत असताना त्यांनी अनेक किताबी लढती जिंकल्या आहेत. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी खेळातील प्रशिक्षकाचा एनआयएस डिप्लोमा केला.
कौशल्याची केली पायाभरणी...
टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सध्या मेरिकोमचे प्रशिक्षक असलेले छोटेलाल यादव व मुलांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले जयसिंग पाटील यांना पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या खडकी येथील बॉईज हॉस्टेलमध्ये शाहूराज बिराजदार यांनी घडविले. या जोरावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करीत अनेक पदके पटकाविली. यानंतर ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू लागले. मात्र या सर्वांची पायाभरणी शाहूराज बिराजदार यांनी केली.