लायन्सला वचपा काढण्याची संधी
By admin | Published: May 6, 2016 05:10 AM2016-05-06T05:10:26+5:302016-05-06T05:10:26+5:30
सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान गमविणाऱ्या गुजरात लायन्सला आज शुक्रवारी ‘आयपीएल-९’मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला त्यांच्याच घरच्या
हैदराबाद : सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान गमविणाऱ्या गुजरात लायन्सला आज शुक्रवारी ‘आयपीएल-९’मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवून पराभवाची परतफेड करण्याची संधी राहील. दुसरीकडे हैदराबादला स्टार खेळाडू युवराज सिंगची प्रतीक्षा असेल.
युवराज यंदा एकही सामना खेळला नाही. टी-२० विश्वचषकादरम्यान आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तो जखमी झाला होता. गुजरातला किंग्स पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे हैदराबादविरुद्ध पुन्हा एकदा विजयासह लय पकडण्याची गुजरातला अपेक्षा असावी. हैदराबादने मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला १५ धावांनी पराभूत केले होते. दोन सामने गमविल्यानंतर केकेआरपाठोपाठ लॉयन्स दुसऱ्या स्थानावर आला. हैदराबाद चार विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादने २१ एप्रिल रोजी लायन्सला दहा गड्यांनी धूळ चारली होती. सांघिक कामगिरी करणारा संघ म्हणून हैदराबादने मुसंडी मारली हे विशेष. कर्णधार डेव्हिड वॉर्नर फॉर्ममध्ये आहे. शिखर धवन यालादेखील सूर गवसला. वॉर्नरने बेंगळुरूविरुद्ध ५० चेंडूंत ९२ धावा ठोकल्या होत्या.
केन विलियम्सन यानेदेखील यशस्वी पुनरागमन करीत ३८ चेंडूंत ५० धावांचे योगदान दिले होते. मधल्या फळीत मोझेस हेन्रिक्स, नमन ओझा, दीपक हुडा यांनीही दमदार कामगिरी केली. हेन्रिक्सने मागच्या सामन्यात १४ चेंडूंत ३१ धावा केल्या. युवराज परतल्यानंतर संघाची फलंदाजी आणखीच भक्कम होणार आहे. हैदराबादकडे आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान
आणि हेन्रिक्स हे चांगले गोलंदाज आहेत. लायन्सचे देखील नऊपैकी सहा विजयआणि तीन पराभवांनंतर १२ गुण आहेत. (वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, मोझेस हेन्रिक्स, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर व टी. सुमन.
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉल्कनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.