नवी दिल्ली : ‘खेलो इंडिया शालेय स्पर्धा’ या उपक्रमानंतर आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘खेलो इंडिया युवा स्पर्धा’ आयोजित करण्याचे ठरविले असून या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला बहाल करण्यात आले आहे. महाराष्ट्राने या स्पधेर्साठी बोली लगावत बाजी मारली.केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी महाराष्ट्राचे शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली. स्पर्धेचे यजमानपद पुणे शहरास बहाल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा पुढील वर्षी ९ ते २० जानेवारी दरम्यान होईल. ज्यामध्ये देशातील ९ हजार खेळाडूंची नोंदणी केली जाईल. यासंदर्भात, राठोड म्हणाले की, ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेचे यश पाहता आम्ही युवा खेळाडूंसाठी स्पर्धांची योजना आखली होती. त्यासाठी तीन राज्यांनी बोली लावली होती आणि महाराष्ट्राने बाजी मारली. या शर्यतीत आसाम व झारखंड हेही होते. देशात आंतरराष्ट्रीय स्तराचे वातावरण निर्माण व्हावे. युवा खेळाडूंच्या प्रतिभेचा शोघ घेता यावा, यासाठी पंतप्रधानांनी आमच्यापुढे विचार ठेवला होता. खेलो इंडियाला आता शालेय स्तरावरून युवा स्पर्धापर्यंत पोहचण्यापर्यंत आम्ही आलो आहोत. निश्चितपणे ही वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.’राठोड पुढे म्हणाले, ‘गेल्या वर्षीप्रमाणेच १७ वर्षांखालील खेळाडूंसोबत यंदा २१ वर्षांखालील स्पर्धा होतील. गेल्या वर्षी या स्पर्धांत जवळपास साडे तीन हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी ही स्पर्धा चांगली पद्धतीने आयोजित होईल की नाही याबाबत लोकांमध्ये शंका होती. मात्र, आम्ही ती यशस्वी करून दाखवली. आता ९ हजार खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे.’गेल्या वर्षी खेलो इंडियाच्या यशस्वीतेनंतर राज्य सरकारने यजमानपदासाठी मन बनवले होते. आम्ही गेल्याच वर्षी तयारी करीत होतो. या स्पर्धेमुळे भारत आणि खासकरून महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती विकसित करण्यास मदत मिळेल.-विनोद तावडे, क्रीडामंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राने मिळवले खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 1:45 AM