- प्रमोद आहेरशिर्डी : ‘महाराष्ट्रातील मल्लांमध्ये ऑलिंपिक गाजवण्याची क्षमता आहे. मात्र येथील मल्ल अल्पसंतुष्ट आहेत. त्यांना महाराष्ट्र केसरी व त्यातून सरकारी नोकरी मिळाली की ते येथेच थांबतात. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्र केसरीमुळे राष्ट्रीय कुस्तीचे मोठे नुकसान होत आहे,’ अशी खंत राष्ट्रीय कुस्ती संघाचे अध्यक्ष व खासदार बृजभुषण शरणसिंग यांनी व्यक्त केली. ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेच्या निमित्ताने शरणसिंग गेल्या तीन दिवसांपासून शिर्डीत आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.शरणसिंग म्हणाले, ‘पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आॅलिंपिकसाठी चार मल्ल पात्र झाले असून दुस-या फेरीनंतर ही संख्या दहावर पोहचेल. आम्ही नक्कीच सुवर्ण पदक मिळवू. कुस्ती हा नैसर्गिक खेळ आहे. फ्री स्टाईल कुस्तीचा जन्म भारतात झाला. क्रिकेट केवळ आठ देशात खेळला जातो. कुस्ती १३० देशात खेळली जात आहे. सध्या देशात कुस्तीमध्ये हरियाणा पहिल्या क्रमांकावर असून अंदमान निकोबार व पूर्वेकडील अरुणाचल, सिक्कीमसारख्या काही राज्यात कुस्तीचा प्रसार झाला नाही.’‘क्रिकेटनंतर रँकिंगवर खेळणारा कुस्ती हा पहिला खेळ आहे़ क्रमवारीनुसार मल्लांना जास्तीतजास्त वार्षिक तीन लाख ते तीस लाख रुपये मदत दिली जाते़ देशातील शंभर खेळाडूंवर दरवर्षी पाच कोटी रूपये खर्च केले जातात़ बजरंग पुनीयाला वर्षाला तीस लाख, दिनेशला पंचवीस, साक्षी मलिक व सुशीलला प्रत्येकी २० लाख रुपये दरवर्षी डाएट व प्रशिक्षणासाठी दिले जात आहे,’ असेही शरणसिंग यांनी यावेळी सांगितले.खाशाबा जाधव यांच्यासाठी निवेदनभारताचे पहिले आॅलिम्पिक पदक विजेते कुस्तीगीर दिवंगत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी राहाता तालुका कुस्ती तालीम संघाकडून करण्यात आली. यासाठी संघाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभुषण शरणसिंग यांच्याकडे निवेदन दिले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे झाले राष्ट्रीय कुस्तीचे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:12 AM