पुणे : उस्मानाबादच्या हणमंत पुरी आणि सोलापूरच्या आबासाहेब अटकळे यांनी अनुक्रमे ७९ किलो आणि ५७ किलो वजनी गटातील माती विभागात बाजी मारत यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण सुरुवात केली. हणमंतने आपल्या अंतिम सामन्यात एकतर्फी बाजी मारली, तर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात आबासाहेबने निर्णायक एक गुण मिळवत सुवर्ण पदकावर कब्जा केला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या स्पर्धेला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात धडाक्यात सुरुवात झाली. यामध्ये उस्मानाबाद आणि सोलापूरच्या मल्लांनी यंदाचे पहिले सुवर्ण मिळवण्याचा मान मिळवला. माती विभागातील ७९ किलो वजनी गटाची अंतिम लढत एकतर्फी रंगली. हणमंतने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत सोलापूर जिल्ह्याच्या सागर चौगुलेला एकही संधी न देताना ५-० असा दणदणीत विजय मिळवला. हणमंतच्या दमदार खेळापुढे सागरला पुनरागमन करण्याची एकही संधी मिळाली नाही. त्याचवेळी कांस्य पदकाच्या लढतीमध्ये नाशिकच्या धर्मा शिंदेने बाजी मारताना परभणीच्या गिरिधारी दुबे याचा ८-२ असा पराभव केला.दुसरीकडे, मातीमधील ५७ किलो गटाची अंतिम लढत दिग्गज मल्ल काका पवार यांच्या शिष्यांमध्येच रंगली. आबासाहेबने यावेळी सुवर्ण पटकावले खरे, मात्र यासाठी त्याला कुस्तीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरच्या संतोष हुरुगडे याच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला. दोघांनी तोडीस तोड खेळ करताना ८-८ अशी बरोबरी साधली. मात्र अंतिम क्षणी आबासाहेबने निर्णायक एक गुण मिळवत सुवर्ण पदकावरा नाव कोरले. त्याचवेळी नाशिकच्या ओंकार लाड याने कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले.सोलापूरचा रामचंद्र अंतिम फेरीतमॅटवरील ७९ किलो वजनी गटात सोलापूरच्या रामचंद्र कांबळेने एकतर्फी झालेल्या सामन्यात कोल्हापूरच्या निलेश पवार याचा १३-४ असा पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, उस्मानाबादच्या रवींद्र खरेने सुवर्ण पदकासाठी आपली दावेदारी सिद्ध करताना साताºयाच्या श्रीधर मुळेचा ४-१ असा पराभव केला. शनिवारी होणाºया अंतिम सामन्यात रामचंद्र आणि रवींद्र यांच्यात कोण बाजी मारतो? याकडेच कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.