- जयंत कुलकर्णी जालना : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आक्षेप पुणे येथील आतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्लांनी घेतला आणि माती आखाडा ताब्यात घेऊन तेथेच ते बसून राहिले. अभिजीत कटके-गणेश जगतापच्या निकालावर आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या पैलवानांनी मातीच्या आखाड्यावर ठाण मांडलं होते.
या गोंधळाला ठिणगी आज सकाळी महाराष्ट्र केसरी गटाच्या जालना येथील विलास डोईफोडे याने पोपट घोडके याच्यावर आक्षेप घेतला. पोपट घोडके हा मुंबईचा नसताना तो मुंबईचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा विलास डोईफोडे याचा आक्षेप होता. त्यानंतरच गोंधळास सुरुवात झाली. त्यानंतर गतविजेता अभिजीत कटके व गणेश जगताप यांच्या लढतीदरम्यान झाला. या लढतीत अभिजीत कटके विजयी ठरला. या लढतीत गणेश जगताप याने पट काढला आणि अॅक्शन सुरु असतानाच पंचांनी जाणीवपूर्वक ही कुस्ती थांबवताना गणेश जगतापवर अन्याय केल्याचे प्रशिक्षक रास्कर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गणेश जगताप याच्याआधीही नीलेश लोखंडे याच्यावर अन्याय झाल्याचा दावा त्यांनी केला. आमच्यावर प्रत्येक वर्षी महाराष्ट्र केसरी वजन गटात अन्याय केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. काका पवार यांचा मल्ल महाराष्ट्र केसरी होऊ द्यायचा नाही, त्यांना खाली कसे खेचता येईल याविषयी राजकारण केले जात असल्याचे आनद रास्कर यांनी सांगितले.
तर गुन्हे दाखल होतील : संयोजन समिती अध्यक्ष अर्जुन खोतकरमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुस्त्या पारदर्शकपणे पार पाडल्या जात आहेत. स्पर्धेचे सुंदर नियोजन होत आहे. हे नियोजन बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अन्याय होत असेल तर त्याविषयी रीतसर दाद मागता येते तसेच तक्रारही करता येते. तथापि, महाराष्ट्र केसरीत कोणी जाणीवपूर्वक गडबड केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही. वेळ पडल्यास गोंधळ करणाऱ्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील, असे संयोजन समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले.