महाराष्ट्र केसरी कुस्ती : गतविजेत्या अभिजित कटकेची धडाक्यात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 07:19 PM2018-12-21T19:19:15+5:302018-12-21T19:20:01+5:30
मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गतविजेता अभिजित कटकेने यंदा दमदार सुरुवात केली आहे. या वर्षीच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपली ...
मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गतविजेता अभिजित कटकेने यंदा दमदार सुरुवात केली आहे. या वर्षीच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपली चमक दाखवली. पहिल्या लढतीत त्याने गेल्या वर्षी दुखापतीमुळे पहिल्याच फेरीतून बाहेर पडलेला शिवराज राक्षेवर विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अभिजितने पहिला सामना कसा जिंकला, पाहा हा व्हिडीओ
६१ किलो माती विभागात सेमी फायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सुळचा ७-० अशा गुणफरकाने पराभव करून अंतिम फेरीत गाठली, तत्पूर्वी निखिलने उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेला ४-२ असे नमवून सेमीफायनल गाठली होती. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटील आणि उस्मानाबादच्या दत्ता मेटे यांच्यात झालेल्या अत्यंत अटीअटीची लढतीत राहुल पाटीलने दत्ता मेटेवर १२-११ असा निसटसा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या (कांस्यपदक) लढतीत साताऱ्याच्या सागर सूळने उस्मानाबादच्या दत्ता मेटेवर ५-४ अशी मात करत कांस्यपदकाची कमाई केली.
६१ किलो वजनी गटात गादी विभागाच्या सेमी फायनल मध्ये कल्याणच्या जयेश साळवीने नाशिकच्या सागर बर्डेचा १०-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने जालन्याच्या अक्षय धानोरेवर ४-२ अशी मात करून अंतिम फेरी गाठली आहे.
तिसऱ्या (कांस्यपदक) क्रमांकासाठी झालेल्या नाशिकच्या सागर बर्डेने औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा ८-२ अशा गुण फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकाविले, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलनेही जालन्याच्या अक्षय धानोरेवर १०-० अशी मात करत कांस्यपदक जिंकले.
७० किलो गादी विभागातल्या उपांत्य लढतीत कोल्हापुरच्या स्वप्निल पाटीलने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीला ४-३ ने हरवत अंतिम फेरीत धडक मारली. पुण्याच्या शुभम थोरातने सोलापुरच्या धिरज वाघमोडेला ८-२ अशा गुणाधिक्क्याने पराभव करून अंतिमफेरी गाठली. या गटातील कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीने लातूरच्या आकाश देशमुखचा ७-२ अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकाविले. तर सोलापूरच्या धीरज वाघमोडेनेही साताऱ्याच्या आकाश मानेवर ८-५ अशी मात करून कांस्यपदक जिंकले.
७० किलो गादी विभागाच्या सेमी फायनलमध्ये पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोपडेने लातूरच्या चंद्रशेखर पाटीलवर २-० अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली, तर दुसऱ्या सेमी फायनलच्या लढतीत अहमदनगरच्या अक्षय कावरेने कोल्हापूरच्या इंद्रजित मगदुमचा १२-१ अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर माती विभागातून अरुण खेगळे हा कांस्य पदकाचा मानकरी ठरला.