पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित ६३व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण असणार, याबाबत राज्यभरातील कुस्तीच्या चाहत्यांसह तमाम क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. पण या स्पर्धेचा आखाडा कसा बनवला, याबाबतची लोकांमध्ये उत्सुकता आहे.
मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखडे बनविण्यात आले. या मातीत १ हजार लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लीटर ताक व ६० लीटर तेल घालून मातीचे आखडे तयार झालेत. मल्लांना स्पर्शांतून, जखमांतून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण न होण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. ४० बाय ४० चे रिंगण व ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चार आखडे बनविण्यात आलेत. आखाड्यांचा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटाचा भाग पंचांसाठी व त्या बाहेर १० फूट भाग मल्लांच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
७ जानेवारीपर्यंत रंगणाºया या स्पर्धेसाठीची तयार पूर्ण झाली असून मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत माती आणि गादीवरील (मॅट) प्रत्येकी १० अशा एकूण २० वजन गटांमध्ये लढती होतील. स्पर्धेत ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी गट असे दहा वजनी गट आहेत. राज्याच्या विविध भागांतील सुमारे ९५० मल्ल आणि १२५ पंच या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
अभिजित कटकेवर लक्षपुण्याचा अभिजित कटकेवर कुस्तीप्रेमींचे विशेष लक्ष असेल. तो दुसºयांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविण्याच्या इराद्याने लढेल. २०१७ मध्ये महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर २०१८ मध्ये मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत बुलडाण्याचा बाला रफिक शेखने त्याला धक्का दिला होता. बाला रफिक आणि २०१७ चा उपविजेता किरण भगत दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत अभिजितच्या दुसºया किताबाची उत्सुकता आहे.