महाराष्ट्रविरुध्द युवा रिषभ पंतचा धडाकेबाज त्रिशतकी तडाखा

By admin | Published: October 17, 2016 03:44 AM2016-10-17T03:44:39+5:302016-10-17T03:44:39+5:30

युवा यष्टीरक्षक रिषभ पंत (३०८) याने झळकावलेल्या दमदार त्रिशतकाच्या जोरावर बलाढ्य दिल्लीने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटात महाराष्ट्राविरुध्द ५९० धावांची मजल मारली.

Maharashtra Rashtriya Prajat striking a triple strike against Maharashtra | महाराष्ट्रविरुध्द युवा रिषभ पंतचा धडाकेबाज त्रिशतकी तडाखा

महाराष्ट्रविरुध्द युवा रिषभ पंतचा धडाकेबाज त्रिशतकी तडाखा

Next


मुंबई : कारकीर्दीतील चौथाच प्रथम श्रेणी सामना खेळत असलेला युवा यष्टीरक्षक रिषभ पंत (३०८) याने झळकावलेल्या दमदार त्रिशतकाच्या जोरावर बलाढ्य दिल्लीने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटात महाराष्ट्राविरुध्द ५९० धावांची मजल मारली. परंतु, तरीही दिल्लीकर ४५ धावांनी पिछाडीवर राहिले. चौथ्या दिवशी पंत त्रिशतक झळकावून बाद झाल्यानंतर पुढील १३ धावांत दिल्लीचा डाव संपुष्टात आणून महाराष्ट्राने निर्णयाक आघाडी मिळवली.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व राहिले. महाराष्ट्राचा कर्णधार स्वप्निल गुगाळे आणि अंकित बावने यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५९४ धावांच्या विक्रमी भागीदारीची चर्चा सुरु असतानाच पंतने धडाकेबाज त्रिशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले.
पंतने ३२६ चेंडूत ४२ चौकार आणि तब्बल ९ षटकारांची आतषबाजी करताना ३०८ धावांचा तडाखा दिला. त्याच्या या आक्रमकतेपुढे गुगाळेची खेळी काहीशी मागे पडली. परंतु, मोक्याच्यावेळी त्याला बाद करण्यात यश मिळवल्याने महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. तर, दिल्लीकरांना एका गुणावर समाधान मानाव लागले.
विशेष म्हणजे, त्रिशतक पुर्ण केल्यानंतर पंत लगेच बाद झाला, त्यावेळी दिल्लीच्या धावफलकावर ७ बाद ५७७ धावा लागल्या होत्या आणि त्यानंतर केवळ १३ धावांत उर्वरीत ३ फलंदाजांना माघारी धाडत महाराष्ट्राने दिल्लीकरांना गुंडाळले.
५ बाद ३७६ धावांवरुन सुरुवात केलेल्या दिल्लीने पंतच्या जोरावर मोठी मजल मारली. चौथ्या दिवशी पंत वैयक्तिक १५५ धावांवर खेळत होता. यानंतर त्याने सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. पंतने वरुण सूद (नाबाद ३२) याच्यासह सातव्या विकेटसाठी निर्णायक १८२ धावांची निर्णायक भागीदारी केली. महाराष्ट्राकडून मोहसिन सय्यद (३/१२१) आणि चिराग खुराना (३/१४३) यांनी चांगला मारा केला.
यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या महाराष्ट्राने दिवसअखेर बिनबाद ५८ धावा करुन सामना अनिर्णित राखला. पहिल्या डावात दणकेबाज त्रिशतक झळकावलेल्या गुगाळेला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)
>संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र (पहिला डाव) : १७३ षटकात २ बाद ६३५ धावा (घोषित)
दिल्ली (पहिला डाव) : १५५ धावांत सर्वबाद ५९० धावा (रिषभ पंत ३०८, ध्रुव शोरे ७१, मिलिंद कुमार ४५; मोहसिन सय्यद ३/१२१, चिराग खुराना ३/१४३)
महाराष्ट्र (दुसरा डाव) : १५ षटकात बिनबाद ५८ धावा (हर्षद खाडिवले नाबाद ३८, चिराग खुराना नाबाद १९)

Web Title: Maharashtra Rashtriya Prajat striking a triple strike against Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.