महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : अमोल, समीर, सुधीर यांची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 03:13 PM2019-03-09T15:13:37+5:302019-03-09T15:14:10+5:30
मुंबईच्या अमोल शिंदेने रायगडच्या ऐझाज मुझावरला २५-६, २५-३ असे सरळ दोन गेममध्ये नमवित दुसरी फेरी गाठली.
मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित अकराव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या अमोल शिंदेने रायगडच्या ऐझाज मुझावरला २५-६, २५-३ असे सरळ दोन गेममध्ये नमवित दुसरी फेरी गाठली. ठाण्याच्या समीर अन्सारीने एकतर्फी झालल्या लढतीत मुंबई-उपनगरच्या विनायक अदितचा २५-०, २५-० असा फाडशा पाडत वर्चस्व सिद्ध करत दुसरी फेरी गाठली.
पुण्याच्या सुधीर महापुरेने सरळ दोन गेममध्ये मुंबई-उपनगरच्या मझहर मुझावरचा २५-३, २५-२ असा धुव्वा उडवित पुढची फेरी गाठली. मुंबईच्या रघुनाथ वाघपंजेने दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबई-उपनगरच्या अरुण चंदेलियाचा २५-१९, २५-१४ असा पराभव करुन कूच केली. ही प्रतिष्ठेची राज्य गुणांकन स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने शिवाजी पार्क जिमखाना येथे अत्यंत नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला विक्रमी ४५० खेळाडूंचा सहभाग लाभला आहे.
मुंबईच्या सलमान खानने ठाण्याच्या रॉबर्ट स्वामीचा दोन गेममध्ये २५-०, २५-१ असा फाडशा पाडत विजयी आगेकूच केली. ठाण्याच्या महेश शेट्येने मुंबईच्या भास्कर गवसचा २५-५, २५-० असा सरळ दोन गेममध्ये निष्प्रभ करत दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या एका दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या फैजान अन्सारीने मुंबईच्याच मनोज पाटीलचा २५-१, २५-६ असे नमवित कूच केली. दुसऱ्या एका सामन्यात मुंबई-उपनगरच्या शहीद नवाझने पालघरच्या ज्युनिअर खेळाडू अविराज अखाडेचे २५-१४, २५-३ असे सरळ दोन गेममध्ये त्याचे आव्हान संपुष्टात आणले.
ह्या प्रतिष्ठित कॅरम स्पर्धेचा उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे व जिम्नॅस्टिक्सच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, मार्गदर्शन व खेळाडू श्रीमती वर्षा उपाध्ये यांच्या हस्ते कॅरम बोर्डवर खेळून संपन्न झाला.