महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : जागतिक विजेता योगेश परदेसीला पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:52 PM2019-03-11T18:52:25+5:302019-03-11T18:53:01+5:30

बिनमानांकित मुंबईच्या जितेंद्र काळेने नोंदवला धक्कादायक निकाल

Maharashtra State Carrom Competition: World Champion Yogesh Pardeshi shocking defeat | महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : जागतिक विजेता योगेश परदेसीला पराभवाचा धक्का

महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : जागतिक विजेता योगेश परदेसीला पराभवाचा धक्का

Next

मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित अकराव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात बिनमानांकित मुंबईच्या जितेंद्र काळेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या रोमहर्षक लढतीत पुण्याच्या माजी जागतिक व राष्ट्रीय विजेता आठवा मानांकित योगेश परदेसीची ९-२५, २५-७, २५-७ अशी कडवी झुंज मोडीत काढत स्पर्धेत मोठी खळबळ माजवली. 

बिनमानांकित अमोल सावर्डेकरने दोन गेम रंगलेल्या लढतीत माजी राष्ट्रीय व राज्य विजेता मुंबईच्या संजय मांडेवर २५-९, २५-१९ अशी सरळ दोन गेममध्ये मात करून स्पर्धेत उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. अत्यंत चुरशीच्या तीन गेम रंगलेल्या लढतीत ठाण्याच्या राजेश गोहिलने रायगडच्या सुरेश बिस्तची १४-२५, २५-९, २५-० अशी कडवी झुंज मोडीत काढली. धुळ्याच्या निसार अहमदने दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबई-उपनगरच्या अझिम काझीचा २५-११, २५-१२ असा फाडशा पाडत उप-उपांत्य पूर्व फेरी गाठली. 

मुंबईच्या संदिप दिवेने दोन गेम रंगलेल्या लढतीत जळगावच्या मोहसीन सय्यदला २५-१९, २५-१३ असे निष्प्रभ केले. पुण्याच्या अभिजित त्रिफणकरने दान गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या माजी राज्य विजेता अनंत गायत्रीचा २५-८, २५-११ असा फाडशा पाडला. मुंबईच्या अशोक गौरने मुंबई-उपनगरच्या कल्पेश नलावडेवर दोन गेम रंगलेल्या  लढतीत  २५-८, २५-६ अशी मात करत कूच केली. मुंबईच्या विकास धारियाने दोन गेम रंगलेल्या लढतीत पुण्याच्या राजेश कोरटकरचा २५-९, २५-१२ असा धुव्वा उडवित पुढच्या फेरीत प्रवेश मिळविला.

माजी जागतिक उपविजेता मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरानने सरळ दोन गेममध्ये मुबंई-उपनगरच्या इश्तियाक अन्सारीचे २५-६, २५-८ असे आव्हान परतवून लावले. तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई-उपनगरच्या शाहबाज शेखने मुंबईउपनगरच्याच शरद मोरेची १२-२५, २५-१२, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढली. चौथा मानांकित मुंबईच्या योगेश डोंगडेने दोन गेम रंगलेल्या लढतीत पालघर जिल्हा विजेता विश्वनाथ देवरुखकरची २५-१७, २५-७ अशी झुंज मोडीत काढली. 

महिला एकेरी गटाच्या उप-उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीच्या सहावी मानांकित मैत्रेयी गोगटेने माजी राज्य विजेती मुंबईच्या शिल्पा पलनीटकरचे २१-२५, २५-१८, २५-९ असे तीन गेममध्ये आव्हान संपुष्टात आणून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईच्या शुभदा नागावकरने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत ठाण्याच्या आठव्या मानांकित मिनल लेलेची ९-२५, २५-९, २५-५ अशी कडवी झुंज मोडीत काढली. अग्रमानांकित मुंबईच्या काजल कुमारीने सरळ दोन गेममध्ये रत्नागिरीच्या अपूर्वा नाचणकरचा २५-८, २५-६ असा पराभव करून आगेकूच केली.

दुसऱ्या एका दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्या स्नेहा मोरेने माजी राष्ट्रीय व ९ वेळची राज्य विजेती मुंबईच्या अनुपमा केदारला २५-१७, २५-१० असे नमवून उप-उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या  मानांकित मुंबईच्या माजी राज्य व सार्क विजेती आयेशा मोहम्मदने पालघरच्या श्रृती सोनावणेचा २५-५, २५-० असा धुव्वा उडवित उप-उपांत्य फेरी गाठली. 

तत्पूर्वी  झालेल्या तिसऱ्या फेरीच्या रंगतदार तीन गेमच्या लढतीत ठाण्याच्या आठव्या मानांकित मिनल लेलेने पालघरच्या आसावरी जाधवची २५-१३, १६-२५, २५-१३ अशी कडवी झुंज मोडीत काढली. दुसऱ्या एका लढतीत पालघरच्या श्रृती सोनावणेने रोमहर्षक तीन गेममध्ये प्रौढ गटाची माजी राष्ट्रीय विजेती शोभा कामतचा २५-२१, ७-२५, २५-९ असा पराभव करत वर्चस्व सिद्ध केले. 
 

Web Title: Maharashtra State Carrom Competition: World Champion Yogesh Pardeshi shocking defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.