महाराष्ट्रच्या मुले व मुली दोन्ही संघांनी 17 वर्षांखालील गटात गटात खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्णकामगिरी केली. महाराष्ट्राच्या मुलांनी गुजरातवर 19-11 अशा फरकाने विजय मिळवला, तर मुलींनी दिल्लीवर 14-8 असा विजय नोंदवला.मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात दहा गुणांची कमाई केली. गुजरात संघाला केवळ पाच गुणांची कमाई करता आली.गुजरातच्या संघाने तिस-या डावात 6 गुणांची कमाई केली. चौथ्या डावात महाराष्ट्र संघाने आणखीन 9 गुणांची कमाई करत छाप पाडली व सुवर्णपदक मिळवले.
मुलींच्या महाराष्ट्र संघाने दिल्लीविरुद्ध चांगली कामगिरी केली. दिल्लीच्या संघाने पहिल्या डावात चार गुणांची कमाई केली. महाराष्ट्र संघाने दुस-या डावात दिल्लीच्या नऊ खेळाडूंना बाद केले. तिस-या डावात दिल्लीच्या संघाने चार गुणांची कमाई केली तर, महाराष्ट्राच्या संघाने आणखीन पाच गुणांची भर घातली.
मुलांच्या गटात केरळ व तेलंगणा संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, मुलींच्या 17 वर्षाखालील गटात पंजाब व गुजरात संघ तिस-या स्थानी राहिले. आजच्या विजयाने महाराष्ट्र संघाने राज्यासाठी खो-खो मध्ये चार सुवर्णपदक मिळवून दिले. बॉक्सिंगमध्ये देविका, भावेश अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या बॉक्संग खेळाडूंनी आपली आगेकूच कायम राखली. महाराष्ट्राच्या १९ मुष्टियोद्धांनी उपांत्य फेरी गाठल्याने महाराष्ट्राची किमान तेवढी पदके निश्चित आहेत. मात्र, यातील देविका घोरपडे आणि भावेश कट्टीमणी यांनी एक पाऊल पुढे टाकताना अंतिम पेरीत प्रवेश केला. संकेतला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
येथील साई केंद्राच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आॅलिंपियन मनोज पिंगळे यांच्याकडे पुण्यात मार्गदर्शन घेणा-या देविका घोरपडे हिने १७ वर्षांखालील वयोगटातील ४६ किलो वजन प्रखारात आपल्याच राज्याच्या जान्हवीचा पराभव केला. सुरेख पदलालित्य आणि भक्कम बचाव याच्या जोरावर देविकाने सहकारी जान्हवीचे आव्हान सहज मोडून काढले.
मुलांच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या संकेत गौडला ५२ किलो वजन प्रकारात पराभवाचा सामना करावा लागला. सावध सुरवात आणि स्थिरावण्यासाठी घेतलेला वेळ यामुळे तिस-या फेरीत आक्रमक खेळ करूनही त्याला पहिल्या दोन फेरीतील पिछाडी भरून काढता आली नाही. जज्जेसनी ३-२ असा निकाल दिल्लीचा प्रतिस्पर्धी रोहित मोरच्या पारड्यात टाकला. संकेतने मारलेले पंचेस आण उजव्या हाताचे ठोसे चांगले होते. मात्र, सुरवातीचा सावधपणा त्याला मारक ठरला.
मुलांच्या २१ वर्षांखालील गटात एएसआयमध्ये असलेल्या मुंबईच्या भावेशने हरियाणाच्या अंकितला निष्प्रभ केले. पहिल्या फेरीपासून आक्रमक राहिलेल्या भावेशचे ठोसे परतविताना अंकितच्या बचावाचा कसोटी लागली. त्यातही दुस-या फेरीत त्याने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिस-या फेरीत अंकितची दमछाक झाली आणि त्याचा अचूक फायदा उठवत भावेशने आपल्या सरळ पंच व हुकच्या ठोशांनी त्याला बेजार केले. याच वयोगटात आकाश गोरखा (६० किलो), प्रसाद परदेशी (६९ किलो), पूनम गायकवाड (६० किलो) यांना उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांचे ब्रॉंझ पदक निश्चित झाले आहे.