राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग दुसरा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 08:48 PM2019-01-29T20:48:26+5:302019-01-29T20:48:49+5:30
महाराष्ट्रासह सेनादल, रेल्वे, हरियाणा संघाही बादफेरीत
मुंबई :राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी साखळी सामने पार पडले. रोहा येथे डी. जी. क्रीडागनगरी मैदानात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धाचा थरार बघायला मिळाला. साखळीतील निकालानंतर महाराष्ट्र, गुजरात, सेनादल, कर्नाटक, हरियाणा, बिहार, उत्तराखंड, भारतीय रेल्वे, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश व केरला यासंघांनी बादफेरीतील प्रवेश निश्चित केला.
'अ' गटात महाराष्ट्र विरुद्ध गुजरात यांच्यात गटातील महत्वाचा सामना झाला. दोन्ही संघांनी बादफेरीत आधीच प्रवेश निश्चित केला होता. पण गटात विजयी व उपविजयी साठी लढत झाली. महाराष्ट्र संघाने आक्रमक पवित्रा घेत पहिल्या ७ मिनिटात गुजरातवर दोन वेळा लोण टाकत २१-०४ अशी आघाडी मिळवून देण्यात रिशांक व अजिंक्य यांनी झंजावाती चढायांचा खेळ केला.
मध्यंतरपर्यत ४२-०६ अशी भक्कम आघाडी महाराष्ट्र संघाकडे होती. रिशांक देवडिगाने १२ चढाईत ९ गुणाची कमाई केली. तर अजिंक्य पवारने चढाईत ८ गुणाची कमाई केली. तुषार पाटीलने दोन सुपररेड करीत संघस १० गुण मिळवले. विकास काळे व विशाल माने २-२ पकडी केल्या. महाराष्ट्र संघाने ६०-२७ असा विजय मिळवत गटात विजयी होत बादफेरीत प्रवेश मिळवला.
तर 'ड' गटात बिहार विरुद्ध छत्तीसगड यांच्यात चांगली लढत झाली. बिहारने ३६-३३ असा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश मिळवला. केरलाने झारखंड संघाचा ५९-१३ असा सहज पराभव करत बादफेरीत प्रवेश केला. चंदिगड ने मणिपूर संघाचा ९३-३३ असा धुव्वा उडवला.
कालपासून (२८ जानेवारी) रोहा येथे डी. जी. तटकरे क्रीडानगरी मध्ये ६६ व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. काल उदघाटन नंतर १२ साखळी सामने खेळवण्यात आले. आज स्पर्धेच्या दुसऱ्यादिवशी सकाळ सत्रात साखळी सामन्याना सुरुवात झाली.
'अ' गटात गुजरात विरुद्ध विदर्भ यांच्यात सामना झाला. गुजरात संघाने मध्यंतरापर्यत ३३-०६ अशी आघाडी मिळवली होती. गुजरार संघाने ५०-१६ असा विजय मिळवत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. तर विदर्भ संघ गटातील दोन्ही सामने पराभूत झाल्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले.
केरला विरुद्ध त्रिपुरा यांच्यात झालेल्या लढतीत केरलाने ५३-१९ असा सहज विजय मिळवला. तर हिमाचल विरुद्ध गोवा यांच्यातील लढत चुरशीची झाली. मध्यंतरापर्यत ११-१० अशी शुल्लक आघाडी हिमाचल कडे होती. त्यानंतर हिमाचल प्रदेशने चांगला खेळ करत ३२-२६ असा विजय मिळवला. पोंडीचरी विरुद्ध तामिळनाडू सामना ३१-३१ असा बरोबरीत राहिला.
सकाळ सत्र निकाल:
तामिळनाडू ३१ विरुद्ध पोंडीचरी ३१
हिमाचल ३२ विरुद्ध गोवा २६
केरला ५३ विरुद्ध त्रिपुरा १९
गुजरात ५० विरुद्ध विदर्भ १६
सेनादल ४८ विरुद्ध चंदीगड २९
कर्नाटक ४४ विरुद्ध तेलंगणा २४
हरियाणा ५२ विरुद्ध पश्चिम बंगाल १५
राजस्थान ५९ विरुद्ध जन्मू काश्मीर १०
उत्तराखंड ४४ विरुद्ध पोंडीचरी ३८
भारतीय रेल्वे ५३ विरुद्ध गोवा २४
दिल्ली ५३ विरुद्ध मणिपूर १८
मध्यप्रदेश ४६ विरुद्ध बीएसनेल १६