ऑनलाइन लोकमत -
अस्ताना (कझाकस्तान), दि. 21 - पाचवेळा जगज्जेती ठरलेली मुष्टीयोद्धा मेरी कोम रिओ ऑलिम्पिक 2016 स्पर्धेतून बाहेर पडली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी मेरी कोम यावर्षी होणा-या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकलेली नाही. कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे सुरु असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पिअनशिपच्या दुस-या फेरीत मेरी कोमचा पराभव झाला. या पराभवासोबतच रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्नही तुटलं आहे.
आपल्या पहिल्या सामन्यात मेरी कोमने स्वीडनच्या जुलिआना सोडरस्ट्रोमचा पराभव केला होता. पण दुस-या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या अजीजी निमानीने मेरी कोमचा पराभव केला. मेरी कोम पाच वेळा विश्वविजेता राहिली आहे. तसंच एशियन चॅम्पिअनशिपमध्ये चारवेळा सुवर्णपदक जिंकलेलं आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा होण्याचा मान मिळवला होता.