नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमची बॉक्सिंग विश्वावर 'सत्ता' असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सध्या महिला विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा सुरु आहे आणि या स्पर्धेत मेरीने आपल्या नावावर पदक निश्चित केले आहे. या स्पर्धेतील हे मेरीचे आतापर्यंचे सातवे पदक ठरणार आहे.
मेरीने ४८ किलो वजनी गटामध्ये विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील मेरीचे पदक पक्के झाले आहे. विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत मेरीने आतापर्यंत तब्बल पाच वेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मेरीने कांस्यपदक पटकावले होते.
विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत मेरीने चीनच्या यू वू हिच्यावर ५-० असा विजय मिळवला. आता गुरुवारी उपांत्य फेरीत मेरीचा सामना उत्तर कोरियांच्या ह्यांग मी किम हिच्याबरोबर होणार आहे.