मुंबई इंडियन्सला 'पोलार्ड' पावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 11:35 PM2016-05-11T23:35:31+5:302016-05-11T23:42:42+5:30
केरॉन पोलार्ड आणि जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर ६ विकेट्सने विजय संपादन केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ११ : केरॉन पोलार्ड आणि जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर ६ विकेट्सने विजय संपादन केला. बँगलोरने दिलेले १५२ धावांचे आव्हान मुंबईने ४ गड्यांच्या मोबदल्यात १९व्या षटकात सहज पार केले. केरॉन पोलॉर्डने १९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३५ धावांची विजयी खेळी केली. त्याला बटलरने चागंली साथ देताना २ षटकार आणि १ चौकारांच्या मदतीने ११ चेंडूत २९ धावा चोपल्या. रोहित शर्मा २५, पार्थिव पटेल१, रायडू ४४ आणि राणा ९ यांनी चांगली फलंदाजी केली.
त्यापुर्वी,
विराट, गेल, ए. बी. डिव्हीलियर्स, वॉटसन हे दिग्गज फलंदाज अपयशी ठरूनही के. एल राहुलचे झुंजार अर्धशतक आणि त्याने सचिन बेबीसोबत शेवटी केलेल्या २७ चेंडूंत ५३ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने २० षटकांत ४ बाद १५१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. राहुलने ५३ चेंडूंत ६८ धावांची नाबाद खेळी केली. त्याला ऐन मोक्याच्या क्षणी मोलाची साथ देणारा सचिन बेबी २५ धावांवर नाबाद राहिला.
नाणेफेक जिंकून रोहित शर्माने यजमान आरसीबीला फलंदाजीस पाचारण केले होते. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी डावाची सुरुवात केली. मुंबईला पहिले यश लवकर मिळाले. डावाची सुरवात षटकाराने करणारा धोकादायक कोहलीला मिशेल मॅक्लेनघनने आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला थर्डमॅनची दिशा देण्याच्या प्रयत्नात कोहलीने हरभजनकडे झेल दिला. कोहलीने ७ धावा केल्या. कोहलीनंतर गेलवर सर्वांच्या आशा होत्या; परंतु गेल आज पुन्हा फेल गेला. टीम साउदीला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात गेलचा फटका उंच आकाशात उडाला, मिडॉफवरील रोहित शर्माने त्याचे झेलात रूपांतर केले. गेलने एका चौकारासह ५ धावा केल्या. केवळ १७ धावांत दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने आणि त्याला क्षेत्ररक्षकांनी तितकीच उत्कृष्ट साथ दिल्याने आरसीबीच्या पॉवरप्लेमध्ये केवळ २५ धावा झाल्या होत्या. सलामीवीर लवकर बाद झाल्याने डिव्हीलियर्स आणि राहुल यांना मुक्तपणे खेळता येईना. मुंबईच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी या दोघांना अक्षरश: जखडून ठेवले होते. डिव्हीलियर्सने हरभजनला षटकार ठोकून हात मोकळे करण्याचा प्रयत्न केला. अकराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कृणाल पंड्याने त्याला डीप मिडविकेटवरील अंबाती रायडूकडे झेल देण्यास भाग पाडले. एबीडीने २७ चेंडूंत २४ धावा केल्या.
एबीडी बाद झाल्यानंतर के एल राहुलने डावाची सूत्रे स्वत:कडे घेतली. त्याने मॅक्लेनघनच्या तिसऱ्या षटकात २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १५ धावा वसूल केल्याने आरसीबीच्या गोटात उत्साह पसरला. वॉटसननेही बुमराहच्या स्लोअरवनला षटकार ठोकून त्यात भर टाकली. पण पुढच्याच चेंडूवर तो रोहित शर्माच्या डायरेक्ट थ्रोवर धावचित झाला. वॉटसनने १४ चेंडूंत १५ धावा केल्या.
दरम्यान, लोकल बॉय के. एल राहुलने ४२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात त्याचे ३ चौकार आणि २ षटकार होते. सामन्यावर मुंबईने पूर्णपणे पकड मिळवली असताना १८ वे षटक किरॉन पोलार्डला देण्याचा रोहित शर्माचा निर्णय महागडा ठरला. या षटकात तब्बल २२ धावा गेल्या. पोलार्डला राहुलने एक षटकार, तर सचिन बेबीने दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. या षटकामुळे आरसीबीला दीडशेचा टप्पा गाठता आला. राहुल ६८ (५३ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) आणि सचिन बेबी २५ (१३ चेंडू २ चौकार, २ षटकार) हे दोघे नाबाद राहिले. मुंबईकडून कृणाल पंड्याने १५ धावांत १ बळी घेतला.
तत्पूर्वी, मुंबईने आपल्या संघात एक बदल केला. हार्दिक पंड्याच्याऐवलजी सचिन राणाला संधी दिली. आरसीबीनेही ख्रिस गेलला संधी देताना ट्रॅव्हिस हेडला वगळले आणि इक्बाल अब्दुल्लाच्या जागी एस. अरविंदला संधी दिली.