मुंबई पॉवरलिफ्टिंग : साहिल उत्तेकर ठरला ‘स्ट्राँग मॅन’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:46 AM2019-05-09T02:46:59+5:302019-05-09T02:47:05+5:30
साहिल उत्तेकर आणि संपदा नागवेकर यांनी आपापल्या गटांत दमदार कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे ‘मुंबई स्ट्राँग मॅन’ आणि ‘मुंबई स्ट्रँग वुमन’ किताब पटकावला.
मुंबई : साहिल उत्तेकर आणि संपदा नागवेकर यांनी आपापल्या गटांत दमदार कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे ‘मुंबई स्ट्राँग मॅन’ आणि ‘मुंबई स्ट्रँग वुमन’ किताब पटकावला. विविध वजनी गटांत झालेल्या या स्पर्धेत साहिल व संपदा यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जेतेपदाच्या जवळपासही फिरकू दिले नाही.
मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने आणि शिवनेर मित्र मंडळाच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत साहिलव्यतिरिक्त धर्मेंद्र यादव, आकाश चोरगे, जितेंद्र यादव, समीर दळवी, अजिंक्य पाडवणकर आणि सागर मिराशी यांनीही आपापल्या वजनी गटांत सुवर्णपदक पटकावले. मात्र, अंतिम फेरीत त्यांना साहिलचे तगडे आव्हान परतवण्यात यश आले नाही. महिला गटात संपदाने सर्वांनाच चकित करताना आपल्याहून सरस वजनी गटातील विजेत्या खेळाडूंना मागे टाकत जेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत संपदाला प्रांजली नरवडे, सुवर्णा शिंदे, समृद्धी देवळेकर, तपस्या कोले, निवेदिता खारकर आणि श्रेया बोर्डवेकर यांच्याकडून कडवी झुंज मिळाली.